मिरजेतील सरस्वती वीणेने जी-२० परिषदेतील पाहुण्यांचा पाहुणचार, दहा दिवसांत १५० वीणांची निर्मिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:55 PM2023-01-17T12:55:12+5:302023-01-17T12:55:47+5:30

देश-विदेशातून पाहुणे आपापल्या देशांत परतताना भारतीय संस्कृतीच्या विविध आठवणी सोबत घेऊन जातील

Miraj Saraswati Veena entertains guests at G20 summit, manufactures 150 Veenas in 10 days | मिरजेतील सरस्वती वीणेने जी-२० परिषदेतील पाहुण्यांचा पाहुणचार, दहा दिवसांत १५० वीणांची निर्मिती 

मिरजेतील सरस्वती वीणेने जी-२० परिषदेतील पाहुण्यांचा पाहुणचार, दहा दिवसांत १५० वीणांची निर्मिती 

Next

मिरज (जि. सांगली) : जी-२० परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पुण्यातील बैठकीसाठी देश-विदेशातून पाहुणे आले आहेत. ते आपापल्या देशांत परतताना भारतीय संस्कृतीच्या विविध आठवणी सोबत घेऊन जातील, त्यामध्ये मिरजेतील तंतुवाद्याचीही संस्मरणीय ठेव असेल.

पुण्यात सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या बैठकीवर पूर्णपणे भारतीय संस्कृती व परंपरेचा प्रभाव आहे. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान, मेक्सिको, रशिया आदी ३७ हून अधिक देशांचे १३० हून अधिक प्रतिनिधी बैठकीला आले आहेत. खानपानापासून सर्व पाहुणचारामध्ये भारतीय संस्कृतीला प्राधान्य दिले आहे. बैठकीनंतर पाहुणे परततील, तेव्हा त्यांच्या बॅगा भारतीय भेटवस्तूंनी भरलेल्या असतील. त्यातच वरच्या बाजूला मिरजेच्या सतारमेकर गल्लीतील सरस्वती वीणा विसावलेली असेल.

यासाठी पर्यटन विभागाने पंधरवड्यापूर्वी येथील सतारमेकरांकडे १५० सरस्वती वीणांची मागणी नोंदविली. ती नेहमीप्रमाणे मोठ्या आकाराची नसून फूटभर लांबीची प्रतिकृती स्वरूपातील आहे. पॅकिंग व वाहतूक सुलभ होण्यासाठी काचसामान किंवा अन्य नाजूक कलाकुसर टाळली आहे.
यासाठी बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर, वासीम गोलंदाज, श्रीकृष्ण माने, शब्बीर तांबोळी, वीरेश संकाजे, अल्ताफ पिरजादे आदींनी परिश्रम घेतले.

सहा फुटांचे वाद्य अवघ्या फूटभरात

सुमारे पाच-सहा फूट लांबीचे तंतुवाद्य अवघ्या फूटभर लांबीमध्ये बनविणे किचकट काम होते; पण मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस् क्लस्टरमध्ये ते सोपे झाले. धातूच्या चोचीचे साचे तयार केले. वीणेचा खालील लाकडी भाग सीएनसीवर साकारला. त्यासाठी सीएनसीवर खास प्रोग्राम बनविण्यात आला. वीणेवर आकर्षक रंगसंगती करण्यात आली. अवघ्या १० दिवसांत १५० सरस्वती वीणा बनविण्यात आल्या.


हस्तकारागिरीला यांत्रिकीकरणाची जोड दिल्याने उत्पादनाला मोठा फायदा होतो, हे यानिमित्ताने सिद्ध झाले. यांत्रिकीकरणाची मदत घेताना गुणवत्तेचेही भान राखले आहे. - बाळासाहेब मिरजकर, तंतुवाद्य निर्माते
 

Web Title: Miraj Saraswati Veena entertains guests at G20 summit, manufactures 150 Veenas in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.