मिरज तालुक्यात विद्यमान सदस्यांना फटका
By admin | Published: October 6, 2016 12:53 AM2016-10-06T00:53:40+5:302016-10-06T01:09:13+5:30
आरक्षणामुळे अनेकांची दांडी उडाली : राजकीय समीकरणे बदलणार, खुल्या मतदारसंघात चुरस दिसून येणार
मिरज : मिरज तालुक्यात आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीत सर्वच मतदार संघांच्या आरक्षणात बदल झाल्याने सर्वच विद्यमान सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. एकाही सदस्यांसाठी मतदारसंघ राहिला नाही. सात मतदार संघ सर्वसाधारण खुले राहिल्याने या मतदार संघात चुरस निर्माण होणार आहे. मागासवर्गीयांसाठी आरक्षित असणाऱ्या मतदार संघात राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोध घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
तालुक्यातील पंचायत समिती २२ गणांच्या आरक्षणाची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी राहुल रोकडे व पं. स. विद्यमान सदस्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. २०१२ मध्ये ज्या मतदार संघात स्त्री आरक्षण होते, त्यामध्ये बदल करण्यात आला. चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात एक जि. प. व दोन पंचायत समिती मतदार संघात वाढ झाल्याने २२ मतदार संघाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षण सोडतीत एकही मतदार संघ सुरक्षित न राहिल्याने त्याचा फटका सर्व विद्यमान पुरुष व महिला सदस्यांना बसला आहे. गुंडेवाडी, बुधगाव, नांदे्र, कसबेडिग्रज, समडोळी व म्हैसाळ हे गण सर्वसाधारण खुले राहिल्याने या सातही मतदारसंघात आता काट्याच्या लढती अटळ आहेत. (वार्ताहर)