लोकसंख्येत मिरज तालुका अव्वल...
By admin | Published: July 10, 2014 11:07 PM2014-07-10T23:07:30+5:302014-07-10T23:18:19+5:30
आटपाडीत सर्वात कमी : स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण बिघडले
अविनाश कोळी ल्ल सांगली
लोकसंख्येच्याबाबतीत महाराष्ट्रात सांगली जिल्हा पंधराव्या क्रमांकावर असून जिल्ह्यात सध्या सर्वाधिक म्हणजे ३0 टक्के लोकसंख्या मिरज तालुक्यात आहे. सर्वात कमी ५ टक्के इतकी लोकसंख्या आटपाडी तालुक्यात आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर नागरीकरणाचा वेग मंदावला असून स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाणही बिघडल्याचे दिसून येते.
सध्या जिल्हा सांख्यिकी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी आहे. पन्नास वर्षांपूर्वी २३.५ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर २०११ मध्ये ९.१८ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्राची वाढीची सरासरी १५.९९ इतकी आहे. तुलनेने ही टक्केवारी समाधानकारक आहे.
नागरीकरणाचा वेग गेल्या दहा वर्षात मंदावला आहे. १९९१ ते २00१ या दहा वर्षात नागरीकरणाचा वेग २६ टक्के होता. २00१ ते २0११ या कालावधित तो १३ टक्क्यांवर आला. म्हणजे निम्मे प्रमाण आहे. नागरी लोकसंख्येचे जिल्ह्यातील प्रमाण २६.५६ इतके आहे. जिल्ह्यात नागरी लोकसंख्या ७ लाख १९ हजार इतकी आहे. नागरी लोकसंख्येच्या ७२ टक्के लोकसंख्या ही सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राहते.
१९६१ ते २००१ या चाळीस वर्षांच्या कालावधित जिल्ह्यातील शहरीकरण ८.९१ टक्क्यांनी वाढले आहे. तितक्याच प्रमाणात ग्रामिणीकरण घटल्याचे दिसून येते. महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही समाधानकारक नाही. जिल्ह्यात २०११ पर्यंत साक्षरतेत अजूनही महिला पुरुषांच्या कितीतरी मागे असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या साक्षरतेची टक्केवारी १५.७४ टक्क्यांनी कमी आहे.