Sangli: रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा बाजार.. एजंटांच्या फंड्याने प्रवासी बेजार; मिरजेपासून मुंबईपर्यंत एजंटांचे जाळे
By अविनाश कोळी | Published: July 12, 2024 04:47 PM2024-07-12T16:47:33+5:302024-07-12T16:47:53+5:30
अविनाश कोळी सांगली : तिकीट बुकिंगची घरबसल्या सोय उपलब्ध असतानाही एजंटांच्या जाळ्यात अडकून हजारो रेल्वे प्रवासी लुटले जात आहेत. ...
अविनाश कोळी
सांगली : तिकीट बुकिंगची घरबसल्या सोय उपलब्ध असतानाही एजंटांच्या जाळ्यात अडकून हजारो रेल्वे प्रवासी लुटले जात आहेत. मिरजेपासून मुंबईपर्यंत तिकीट दलालांची मोठी साखळी कार्यरत आहे. जून महिन्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील फसवणूक करणाऱ्या टोळ्या रेल्वे पोलिसांनी पकडल्या. मात्र, तरीही नवनव्या मार्गाने एजंटांनी लुटीचा बाजार सुरुच ठेवला आहे.
एका ट्रॅव्हल एजंटने माधवनगर, आष्टा व पुण्यातील काही भाविकांना चारधामच्या यात्रेचे आमीष दाखवून लूटल्याची घटना नुकतीच उजेडात आली. त्यात मिरजेतील एका रेल्वे तिकीट एजंटाचाही हात समोर आला. याच कालावधीत मुंबई, नोएडा, पुणे, हैद्राबाद येथील अनेक दलालांना अटक केली. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ हॅक करण्यापासून बोगस मागणी दाखवून तिकिटांचे बेकायदेशीर बुकिंग करण्यापर्यंतचे अनेक लुटीचे फंडे यातून समोर आले. अजूनही सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी अशा रेल्वे तिकीट एजंटांची साखळी कार्यरत आहे. सांगली जिल्ह्यातील काही संघटनांनी अशा एजंटांवर कारवाईची मागणीही केली आहे.
अशी होते फसवणूक
- हैद्राबाद येथील एका रेल्वे तिकीट एजंटाने प्रवाशांच्या एका गटाला तिकीट बुकिंग करून दिले. प्रवाशांच्या नकळत ती तिकिटे रद्द करून त्यापोटी आलेली रक्कम त्याने हडप केली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दणका बसला.
- दुसऱ्या एका घटनेत बेकायदेशीर ॲपच्या माध्यमातून एजंटाने बोगस तिकिटे तयार करुन प्रवाशांना दिली.
- तिसऱ्या घटनेत बोगस नावांनी तिकिटे बुक करून तिकीट टंचाई निर्माण करत जादा दराने विक्री केली
- आयआरसीटीसीचे संकेतस्थळ हॅक करून तिकिटांचा काळाबाजारही उजेडात आला.
बोगस नावाने होते बुकिंग
पूर्ण नावाने तिकीट बुकिंग करण्याऐवजी एजंट बऱ्याचदा शेकडो तिकिटांचे बुकिंग केवळ अद्याक्षराद्वारे (उदा. ए. के. किंवा बी. पाटील) तिकिटांचे बुकिंग करतात. प्रवाशांना जादा दराने त्यांच्या नावाशी सार्धम्य असलेली तिकिटे ऐनवेळी विकली जातात.
फसवणुकीवर उपाय काय?
आयआरसीटीसी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवाशांना त्यांच्या नावाने खाते उघडता येते. त्याद्वारे त्यांनी तिकिटांचे बुकिंग करावे. बोगीच्या निवडीपासून आसन व्यवस्थेचे अनेक पर्याय निवडता येतात. त्यात फसवणुकीचा कोणताही धोका नाही. एजंटांना द्याव्या लागणाऱ्या कमिशनचे पैसेही वाचतात.
एजंटांकडून लुटल्या गेलेल्या अनेकांना प्रवासापासून मुकावे लागते. आर्थिक नुकसानीसह पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामुळे एजंटांद्वारे तिकीट बुकिंगचा पर्याय धोक्याचा आहे. प्रत्येक प्रवाशांनी, संघटना किंवा ग्रुपने अधिकृत रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन स्वत: तिकिटांचे बुकिंग करणे शिकले पाहिजे. - उमेश शहा, सदस्य, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप