मिरजेत रेल्वे चालकाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 01:10 PM2022-01-11T13:10:33+5:302022-01-11T13:11:10+5:30
रेल्वे अंगावरून गेल्याने मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. शेजारी पडलेल्या एका छोट्या बॅगेत फोटो व मोबाईल आढळून आला. यावरून हा मृतदेह के. ए. पी. आश्चर्यलू यांचा असल्याची ओळख पटली.
मिरज : मिरजेत के. ए. पी. आश्चर्यलू (वय ४२, रा. प्रथमेश अपार्टमेंट, रेल्वे स्टेशन, मिरज, मूळ गाव विशाखापट्टणम्) या रेल्वे चालकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. साेमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
बेळगाव रेल्वे मार्गावर साेमवारी सकाळी म्हैसाळ उड्डाण पुलापासून ३०० मीटरवर एक पुरुष जातीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे अंगावरून गेल्याने मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. रेल्वेला काही भाग अडकल्याने मृतदेह फरफटत काही अंतरावर गेल्याने चेहऱ्याची ओळख पटत नव्हती. शेजारी पडलेल्या एका छोट्या बॅगेत फोटो व मोबाईल आढळून आला. यावरून हा मृतदेह के. ए. पी. आश्चर्यलू यांचा असल्याची ओळख पटली.
आश्चर्यलू पुणे डिव्हिजन मिरज रेल्वे डेपोत मेल एक्स्प्रेस ड्रायव्हर पदावर कार्यरत होते. रविवारी सकाळी १० वाजता कामानिमित्त बाहेर जाणार असल्याचे सांगून आश्चर्यलू घरातून बाहेर पडले होते. त्यांचा मोबाईल बंद होता. साेमवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळावरून ओळख पटविण्यासाठी फोन चालू केल्यानंतर त्यांचा शोध थांबला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.