मिरजकरांनीच जपला माणुसकीचा खरा धर्म
By admin | Published: July 4, 2016 12:16 AM2016-07-04T00:16:03+5:302016-07-04T00:16:03+5:30
राजेंद्रसिंह राणा : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याबद्दल प्रशंसा, जलदूत एक्स्प्रेसची, विहिरीची पाहणी
मिरज : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी रविवारी मिरज रेल्वे यार्डास भेट देऊन लातूरला पाठविण्यात येणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसची माहिती घेतली. पाण्यासाठी सर्वत्र कलह सुरू असताना, मिरजेतील लोक दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देत असल्याबद्दल राणा यांनी प्रशंसा केली. खऱ्या अर्थाने मिरजकरांनी भारतीय संस्कृतीचे व माणुसकीच्या धर्माचे पालन केल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राणा यांनी रेल्वे यार्डातून दररोज पाणी घेऊन लातूरला जाणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसची व हैदरखान विहिरीची पाहणी केली. ते म्हणाले, मिरजेतून रेल्वेने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे लातूरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मिरजेत रेल्वे स्थानकात टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था कायमस्वरूपी ठेवल्याने भविष्यातही त्याचा उपयोग होईल. लातूरला पाणी देणाऱ्या मिरजेचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. माणुसकीच्या धर्माचे आणि भारतीय संस्कृती अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी रेल्वे स्थानकास भेट देऊन पाणी भरण्याच्या नियोजनाच्या व्यवस्थेची पाहणी केली. टँकरमध्ये पाणी भरण्याची, शुध्दीकरणाची व्यवस्था, हैदरखान विहिरीत करण्यात येणारा पाणीसाठा, लातूरला दोन महिन्यात किती कोटी लिटर पाणी पाठविण्यात आले, याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, ठेकेदार शशांक जाधव यांनी त्यांना माहिती दिली. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू असल्याने नद्यांचे पुनरूज्जीवन आवश्यक आहे, असे मत राणा यांनी व्यक्त केले.
मिरज डेव्हलपमेंट फोरमतर्फे लोकसहभागातून केलेल्या मिरज ओढा सफाईची राणा यांनी पाहणी करून वृक्षारोपण केले. यावेळी मकरंद देशपांडे, गजेंद्र कुळ्ळोळी, पांडुरंग कोरे, पृथ्वीराज पवार, सुकुमार पाटील, राजा देसाई, मनीर मुल्ला, नंदू पवार, जलबिरादाराचे सुनील जोशी, नरेंद्र चूघ, डॉ. रवींद्र व्होरा उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रशासनाचा अडथळा येऊ नये...
मिरजेत लोकसहभागातून सुमारे अडीच किलोमीटर ओढापात्राची सफाई करण्यात आली असताना, तहसीलदारांनी मुरूम खुदाईचा ठपका ठेवून चार कोटी रूपये दंडाची नोटीस दिली आहे. प्रशासनाच्या नोटिसीमुळे ओढापात्र सफाई व पाणीसाठ्यासाठी तलावाची खुदाई बंद करण्यात आल्याची माहिती किशोर पटवर्धन यांनी दिली. त्यावर, लोकसहभागातून चांगले काम चालू असताना यात शासकीय यंत्रणेने अडथळा आणू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मध्यस्थी करून काम सुरू करावे, अशी सूचना राणा यांनी केली.