मिरज पश्चिमला निवडणुकीचे वारे
By admin | Published: October 17, 2016 12:42 AM2016-10-17T00:42:13+5:302016-10-17T00:42:13+5:30
पक्षांची चाचपणी : तालुक्यातील नेते सक्रिय; महिला गटांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार
सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रज
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारसंघ रचना आणि आरक्षणे घोषित झाली असल्याने आता ‘निवडणूक फिवर’ वाढत आहे. मिरज पश्चिम भागात तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
यातील बहुतांशी भाग जुना सांगली आणि नवीन इस्लामपूर विधानसभेचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विरोध एकत्रित करण्यासाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक गट आणि शिवसेना एकत्र आघाडीची चाचपणी सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षात खा. राजू शेट्टी यांना मानणारा शेतकऱ्यांचा मोठा गट सर्व पक्षात होता. पण आता शेतकरी वर्ग थेट स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून काम करीत आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मंत्रीपदामुळे त्यांना मोठे बळ मिळाले आहे. मूळ काँग्रेसजन आता जरी विखुरलेले असले तरी, ‘वसंतदादा’ घराण्यावर अजूनही जनतेची श्रध्दा आहे. पण राष्ट्रवादीकडून मुस्कटदाबी होणारे नेते, कार्यकर्ते विशाल पाटील आणि मदन पाटील गटाला मानणारे असून, परिसरात मात्र हे दोन्ही गट काँग्रेसची बेरीज दाखविणारे आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कसबे डिग्रज, दुधगाव आणि समडोळी येथे ‘वनश्री’ पतसंस्थेने चांगले काम केले आहे. महिला बचत गट कर्जवाटप करताना सामान्य महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण केले आहे.
कसबे डिग्रजमधील विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी खा. राजू शेट्टी, काँग्रेसच्या शैलजा पाटील, हुतात्मा दूध संघाचे गौरव नायकवडी यांच्या उपस्थितीत राहुल महाडिक आणि आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधकांची मिरज पश्चिम भागात आघाडी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी, चांगला प्रस्ताव आहे असे सांगितले होते, तर शैलजा पाटील यांनी, प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव पुढे चालविल्याचे सांगितले होते. कसबे डिग्रज, समडोळी, कवठेपिरान या जि. प. गटाचे सांगली, इस्लामपूर आणि काहीअंशी मिरज येथून प्रभावी विरोधी आघाडीचे संकेत मिळत आहेत. निवडणुकांसाठी मतदारसंघ रचना आणि आरक्षणे घोषित झाल्याने निवडणुकीची चर्चा रंगली आहे.