झोपडी रिकामी करण्याचा वाद ; मिरजेत दोन कुटुंबांमध्ये सशस्त्र हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:44 PM2020-02-28T22:44:53+5:302020-02-28T22:46:28+5:30
पल्ल्या काळे व त्याची पत्नी जुही चावला चोरीसारखे गुन्हे करतात. त्यामुळे या भागात राहणाऱ्या सर्वांनी काळे याच्या घरी जाऊन, तुम्ही येथून निघून जा, तुमच्या वागण्यामुळे आम्हाला त्रास होत आहे, असे सांगितल्याच्या रागातून पल्ल्या काळे याने अंबर पवार यास शिवीगाळ करून, त्यांनी पाळलेल्या शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
मिरज : मिरजेतील ईदगाह माळ येथे झोपडी रिकामी करण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये भांडण होऊन, यात दोघांवर चाकूहल्ला करण्यात आला. चाकूहल्ल्यात प्रवीण ऊर्फ पल्ल्या गंगाराम काळे (वय ३०) व आंबेडला अंबर पवार (२५, दोघे रा. ईदगाह माळ, मिरज) हे दोघे गंभीर जखमी झाले. चाकूहल्लाप्रकरणी जुही चावला प्रवीण ऊर्फ पल्ल्या काळे यांनी अंबर लवलक पवार यांच्याविरुद्ध, तर आंबेडला अंबर पवार यांनी पल्ल्या काळे (दोघे रा. ईदगाह माळ, मिरज) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
प्रवीण ऊर्फ पल्ल्या काळे गुरुवारी रात्री ईदगाह माळ झोपडपट्टीमधील एका पत्र्याच्या खोलीत बसला असताना, अंबर पवार व त्याची पत्नी आंबेडला पवार हे दोघे तेथे आले. यानंतर पवार दाम्पत्याने प्रवीण काळे यास, तुम्ही झोपडी खाली करून का गेला नाही, तुम्ही या ठिकाणी राहायचे नाही, तुम्ही आमच्यासोबत कोणत्याही कामासाठी यायचे नाही, असे सुनावले. या कारणावरून पवार दाम्पत्य व प्रवीण काळे या दोघांत हमरीतुमरी व हाणामारी झाली. यावेळी अंबर पवार याने प्रवीण काळे याच्या डाव्या खांद्यावर आणि उजव्या बाजूला छातीवर चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची तक्रार जुहीचावला काळे यांनी दिली आहे.
पल्ल्या काळे व त्याची पत्नी जुही चावला चोरीसारखे गुन्हे करतात. त्यामुळे या भागात राहणाऱ्या सर्वांनी काळे याच्या घरी जाऊन, तुम्ही येथून निघून जा, तुमच्या वागण्यामुळे आम्हाला त्रास होत आहे, असे सांगितल्याच्या रागातून पल्ल्या काळे याने अंबर पवार यास शिवीगाळ करून, त्यांनी पाळलेल्या शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेळ्यांना वाचविण्यासाठी आंबेडला पवार गेल्यानंतर, पल्ल्या काळे याने ‘तुला जिवत सोडत नाही’, असे म्हणून गळ्यावर व कानावर चाकूने वार केल्याचे आंबेडला पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
शासकीय रूग्णालयात उपचार
चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आलेली नव्हती. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात खुनीहल्ल्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन्ही दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.