मिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस प्रारंभ, दर्गा उरूसानिमित्त आयोजन : श्रोत्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:27 PM2018-04-13T17:27:25+5:302018-04-13T17:27:25+5:30
मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.
मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.
दर्गा आवारातील चिंचेच्या झाडाखाली संगीतरत्न अब्दुल करीम खाँ संगीत सभेच्या सकाळी पहिल्या सत्रात शास्त्रीय गायनास श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला. दर्गा संगीत सभेचा प्रारंभ समीर अभ्यंकर (पुणे) यांच्या गायनाने झाला.
अभ्यंकर यांनी राग देवगंधार आळविला. विलंबित एकतालात रईन के आगे पिहरवा द्रुततालात लाडली बनावत आया हा विलंबित ख्याल त्यांनी सादर केला. त्यांना माधव मोडक यांनी तबलासाथ, तर अजित पुरोहित यांनी हार्मोनियम साथ केली.
सहदेव झेंडे (कवलापूर) यांनी राग बैरागी आळविला. विलंबित एकतालात जागोरे नंदलाल, द्रुत त्रितालात मोरा संदेशवा या चीजा सादर केल्या. त्यांना वीरेश संकाजे यांनी तबलासाथ व संदीप गुळवणी यांनी तानपुरा साथ केली.
रईस खान (धारवाड) यांनी राग नटभैरव गायिला. विलंबित एकतालात रसिया मोरा, द्रुत एकतालात बेग बेग आयो मंदिर या चीजा त्यांनी गायिल्या. त्यांना सागर सुतार यांनी तबला साथ, मनोज जोशी यांनी हार्मोनियम साथ व संदीप गुळवणी यांनी तानपुरा साथ केली.
प्रसन्न गुडी (मुंबई) यांनी राग कोमल रिषभ आसावरी गायिला. तीनताल मध्यलयीत मै तो तुमरे दास जनम जनम ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यांना दादा मुळे यांनी तबला साथ, अजित पुरोहित यांनी हार्मोनियम साथ व नुरमहंमद उगारे यांनी तानपुरा साथ केली.
रात्री दुसऱ्या सत्रात गायन-वादन व जुगलबंदीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत रंगला. दर्गा सरपंच अब्दुल अजीज मुतवल्ली, बाळासाहेब मिरजकर, मोहसिन मिरजकर, मजीद सतारमेकर यांनी संयोजन केले. अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस श्रोत्यांची मोठी गर्दी होती.