मिरजेत स्टेशन रस्ता महिनाभर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:58+5:302021-04-22T04:27:58+5:30
मिरज : मिरजेतील रेल्वेस्थानक ते बसस्थानकांपर्यंत अडीच कोटी रुपये खर्चाच्या ट्रिमिक्स काँक्रीट व हॉटमिक्स रस्त्याचे काम रखडल्याने हा ...
मिरज : मिरजेतील रेल्वेस्थानक ते बसस्थानकांपर्यंत अडीच कोटी रुपये खर्चाच्या ट्रिमिक्स काँक्रीट व हॉटमिक्स रस्त्याचे काम रखडल्याने हा रस्ता महिनाभर बंद आहे. काम सुरू न झाल्यास ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांवर दंडाच्या कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही काम रखडले आहे.
मिरजेतील स्टेशन चाैक ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स पद्धतीने काँक्रीट व हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर दि. २३ नोव्हेंबर रोजी ठेकेदारास देण्यात आली. मात्र, ठेकेदाराने काम सुरू केले नसल्याने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी २० मार्च रोजी या रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास महापालिका अधिकारी व ठेकेदारास दररोज दहा हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशामुळे हा रस्ता महिन्यापूर्वी पत्रे मारून बंद करण्यात आला आहे. त्यानंतर रस्त्यावर खडी पसरून काम थांबले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बांधलेल्या गटारी अर्धवट आहेत. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे व वृक्षतोडीचे काम अद्याप झालेले नाही. या रखडलेल्या कामामुळे रेल्वेस्थानक रस्ता बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आयुक्तांच्या दंडात्मक कारवाईचा आदेशानंतरही ठेकेदारावर दैनंदिन दहा हजार दंडाची कारवाईही होत नसल्याने आणखी सहा महिने हा रस्ता बंद राहण्याची शक्यता आहे.