मिरजेत माजी नगरसेवक पिता-पुत्रावर हल्ला
By admin | Published: April 8, 2017 12:10 AM2017-04-08T00:10:29+5:302017-04-08T00:10:29+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांत हाणामारी
मिरज : मिरजेत भारतनगर परिसरात राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी व त्यांचा मुलगा आरिफ चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला करण्यात आला. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली. या घटनेमुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे समर्थक जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पिटाळले. जखमी आरिफ चौधरी यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इब्राहीम चौधरी यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.
भारतनगर येथील कॉँग्रेस नगरसेविकेचे पुत्र समीर मालगावे यांचा वाहनचालक नौशाद शेख व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आरिफ चौधरी यांच्यात चार दिवसांपूर्वी वादावादी व शिवीगाळीची घटना
घडली होती. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहीम
चौधरी, आरिफ चौधरी, नगरसेवक जुबेर चौधरी हे पिता-पुत्र, नौशाद यास याचा
जाब विचारण्यासाठी गेले होते. शंभरफुटी रोडवर त्यांचा समोरासमोर वाद झाल्यानंतर नौशाद शेख याचे साथीदार ख्वाजा शेख, समीर शेख यांनी आरिफ चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला केला.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गांधी चौक पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी जमलेल्या दोन्ही गटाच्या समर्थकांच्या जमावाला सौम्य लाठीमार करून पिटाळून लावले. मारहाणीत
जखमी आरिफ चौधरी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कॉँग्रेस व राष्ट्रवादी समर्थकांच्या हाणामारीच्या घटनेमुळे भारतनगर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. मारामारीच्या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी गांधी चौक पोलिस ठाण्यात दोन्ही समर्थकांच्या गटांची गर्दी झाली होती. (वार्ताहर)