मिरजेच्या सभापती राजीनामा देणार
By Admin | Published: September 4, 2016 12:15 AM2016-09-04T00:15:29+5:302016-09-04T00:27:30+5:30
पंचायत समिती : कर्नाळचे एडके सभापतिपदाचे दावेदार
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती जयश्री पाटील या राजीनामा देणार, हे निश्चित झाले आहे. नेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांची भेट घेत आपला राजीनामा सादर केला. मात्र, कार्यालयीन वेळ संपल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. आता मंगळवार, दि. ६ सप्टेंबरला त्या आपला राजीनामा सादर करणार आहेत. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सभापतिपदासाठी कर्नाळचे प्रवीण एडके एकमेव दावेदार राहणार आहेत.
पंचायत समितीच्या सभापतीपदी जयश्री पाटील यांची चुरशीने निवड झाली होती. पश्चिम भागाला हे पद मिळण्याची अपेक्षा असताना काँग्रेस नेत्यांनी प्रवीण एडके यांना थांबवून जयश्री पाटील यांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा पूर्व भागाला सभापतिपदाची संधी दिली. पाटील यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. सहा महिन्यानंतर पूर्व-पश्चिम समतोल साधण्यासाठी पश्चिम भागाला पर्यायाने प्रवीण एडके यांनाच संधी देण्याचा काँग्रेस नेत्यांनी शब्द दिला आहे.
जयश्री पाटील यांच्या निवडीवेळी एडके यांना डावलल्याने पश्चिम भागात नाराजीचा सूर होता. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व विशाल पाटील यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याने सभापती पाटील यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्रेहल पाटील यांच्याकडे सायंकाळी उशिराने राजीनामा सादर केला. या राजीनाम्याची प्रक्रिया मंगळवार, दि. ६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.
जयश्री पाटील यांच्या राजीनाम्यामुळे पंचायत समितीत सभापती निवडीसाठी हालचाली सुरू असल्या तरी, कर्नाळचे प्रवीण एडके यांच्या माध्यमातून पश्चिम भागाला न्याय देण्याचा काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेतल्याने एडके सभापतीपदाचे एकमेव दावेदार आहेत. पश्चिम भागाला न्याय देण्यात यावा, यासाठी एडके यांना बहुतांश काँग्रेस सदस्यांचे समर्थन आहे.
दरम्यान, सभापती पाटील यांच्या राजीनाम्यामुळे नवीन सभापती निवडीत विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
समतोल साधणारपंचायत समितीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करताना नेहमीच पूर्व व पश्चिम भागाचा समतोल साधण्यात येतो. मात्र, या सदस्यांच्या कार्यकालात अशोक मोहिते वगळता तीनवेळा पूर्वभागाला संधी देण्यात आली होती. आता सभापतिपदासाठी प्रवीण एडके यांच्या रूपाने पुन्हा एकदा पश्चिम भागाला संधी देत समतोल साधला जाणार आहे.