मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव २१ सप्टेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:16 AM2017-09-11T00:16:00+5:302017-09-11T00:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यावर्षी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नॅश न्युबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे.
या संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरूवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना व ‘डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार’ तबलावादक धनश्री नागेशकर (मुंबई) यांना देण्यात येणार आहे.
अंबाबाई संगीत महोत्सवात दि. २१ ते ३० सप्टेंबर या कालावधित दिग्गज कलाकार गायन-वादन व नृत्य सादर करणार आहेत. दि. २२ रोजी मिरजेचे संगीतकार राम कदम पुरस्कार उत्तरा केळकर यांना महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती अनिता सगरे यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. तसेच दि. २३ रोजी विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार महिला तबलावादक धनश्री नागेशकर यांना धर्मादाय उपायुक्त महावीर जोगी व उद्योजक जितेनभाई झवेरी यांच्याहस्ते देण्यात येणार आहे.
गौरी पाठारे यांच्या शास्त्रीय गायनाने संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम, धनश्री नागेशकर यांचे सोलो तबलावादन, स्वानंदी सडोलीकर (सांगली), पंडित सुहास व्यास (पुणे), शिल्पा प्राणी (पुणे), रेवा नातू (पुणे), प्रवीण कारदगी (बेंगलोर), समीर अभ्यंकर (मुंबई), मंगला जोशी (सांगली), पौर्णिमा कुलकर्णी (बेंगलोर), धनंजय जोशी (नांदेड), प्रसाद खापर्डे (नाशिक), माया मोटेगावकर (मुंबई), पंडित ऋषिकेश बोडस, चंदना देशपांडे (मिरज), पंडित कृष्णेंद्र वाडीकर (हुबळी) यांचे शास्त्रीय गायन, तसेच वरदा बेडेकर (गोवा) यांचे कथ्थक नृत्य, सप्तर्षी हजरा (कोलकाता) यांचे सतारवादन, केतकी बेडेकर (मिरज) यांचे भरतनाट्यम् नृत्य, विश्वेश भोसले व वेदांत बेडेकर यांचे सोलो तबलावादन, शीतल कोलवलकर (पुणे) व शिष्यांचे कथ्थक नृत्य, कौस्तुभ देशपांडे व सहकाºयांचा ‘आनंदतरंग’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे अमेरिकेतील शिष्य नॅश न्युबर्ट यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे.
संगीतरसिकांसाठी मेजवानी असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा समारोप दि. २९ रोजी उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सुभाष सव्वासे यांना ‘अंबाबाई संगीत सेवा पुरस्कार‘ देण्यात येणार आहे. मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले आहे.