पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच मिरजेत श्री समयसार महामंडल विधान महोत्सव, जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:12 PM2022-12-01T14:12:03+5:302022-12-01T14:15:20+5:30
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच हा महोत्सव होत असल्याचे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
मिरज : मिरजेत शनिवार पेठेत श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात श्री समयसार महामंडल विधान महामहोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी दि. २ ते मंगळवारी दि. ६ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. विहार रथोत्सवाने महोत्सवाची सांगता होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच हा महोत्सव होत असल्याचे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
प्रथमाचार्य १०८ श्री शांतीसागरजी महाराज, संतशिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज व शांतमूर्ती वात्सल्स रत्नाकर आचार्य १०८ सन्मतीसागरची महाराज यांच्या कृपासान्निध्यात मुनिश्री सरलसागरजी महाराज, प.पू.आचार्य श्री चंद्रप्रभसागरजी महाराज आणि संस्थान मठ कोल्हापूरचे प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहोत्सव होणार आहे.
शुक्रवार २ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता सौधर्म इंद्रांच्या घरी मुख्य इंद्रांसह मंगलस्नान, हत्तीवरून मंगल आगमन, देव-शास्त्र-गुरू दर्शन, अर्घ्य प्रदान, गुरु निमंत्रण, मंदिर व मंडपासमोरील ध्वजारोहण, मंडप उद्घाटन, अखंड दीपप्रज्वलन, वेदी, मंडप शुद्धी, कंकणबंधन, हत्तीवरून जलकुंभ आणणे, पंचामृत अभिषेक, महाशांतिधारा, संकलीकरण, जाप्य या कार्यक्रमाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
मंगळवार ६ डिसेंबर रोजी महोत्सवाचा समारोप होणार असून, या दिवशी पहाटे सहा वाजता सौधर्म इंद्र-इंद्राणी आगमन, समयसार महामण्डल विधान होमहवन, मंगल जलकुंभ मिरवणूक, पंचामृताभिषेक, महाशांतिधारा, दुपारी आचार्यश्रींचे मंगल प्रवचन, रथोत्सव सवाल कार्यक्रम, सायंकाळी ध्वजावरोहण, विधान मण्डल विसर्जन, आरती आणि त्यानंतर विहार रथोत्सवाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
महोत्सवात संगीता व अजित शेटे यांना (सौधर्म इंद्र-इंद्राणी), अपर्णा व विवेक शेटे (इशान इंद्र इंद्राणी), स्वाती व अभिनंदन शेटे (धनपती कुबेर इंद्र-इंद्राणी), शोभा व कोमल उपाध्ये (सुवर्ण सौभाग्यवती), तनुजा व भरत शेटे यांना महायज्ञनायक इंद्र-इंद्राणीचा मान दिला आहे. तर मयुरी व आशिष शेटे यांना ध्वजारोहण व कल्पना व किरण शेटे यांना मंडप उद्घाटनाचा मान दिला आहे.