मिरजेला दंगलीचा अनुभव नवा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:56+5:302021-07-22T04:17:56+5:30
मिरज : प्रशासनाने व्यापाऱ्यांना वेळ ठरवून द्यावी, मात्र पोलीस व महापालिकेचा कर्मचारी दुकानासमोर येता कामा नये. कोणी आल्यास वाद ...
मिरज : प्रशासनाने व्यापाऱ्यांना वेळ ठरवून द्यावी, मात्र पोलीस व महापालिकेचा कर्मचारी दुकानासमोर येता कामा नये. कोणी आल्यास वाद होऊन विकोपाला जाऊन परिस्थिती बिघडेल. मिरजेला दंगल नवी नाही, असे वक्तव्य भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी बुधवारी व्यापाऱ्यांच्या बैठकीत केले.
आमदार खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयात शहरातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी व व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी प्रशासनाकडून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन नसून, केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. महापालिका क्षेत्रात व मिरज शहरात रुग्णसंख्या कमी झालेली असतानाही मिरजेतील व्यापाऱ्यांवर अन्याय सुरु असून, दुकानाचे दार उघडे दिसताच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. व्यापाऱ्यांचा संयम सुटत चालल्याने आता उद्रेक होणार असल्याचे वासू मेघानी, गजेंद्र कुल्लोळी, अशोक शहा, ओंकार शिखरे, प्रितेन असर यांनी सांगितले. सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी खाडे यांनी चर्चा केली.
खाडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ठराविक व्यावसायिकांना वेठीस धरून प्रशासनाचे निर्बंध कोरोना रोखू शकलेले नाहीत. केवळ व्यापाऱ्यांची दुकाने बंद करून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने शुक्रवारी शहरातील सर्व व्यवसाय व दुकाने सुरु करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून, यापुढे व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ व मी प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर शुक्रवारी मिरजेतील सर्व दुकाने उघडू. यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही खाडे यांनी दिला. व्यापारी बंधूंनी शुक्रवारी सकाळपासून दुकाने उघडावीत, अधिकारी आले तरी घाबरू नये व दंडही भरू नये, असे आवाहन खाडे यांनी केले.
यावेळी स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, भाजप प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, मोहन वाटवे, शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, व्यापारी सेलचे गजेंद्र कुल्लोळी, ईश्वर जनवाडे, रुपाली देसाई यांच्यासह विरंजन कद्दू, राजू चुघ, प्रितेन असर, श्रीकांत महाजन, सुनील कापसे, शंकर मेघानी, किशोर आहुजा, प्रकाश कोकाटे, जितेंद्र मोतुगडे, विनोद सन्मुख, बापू संपकाळ उपस्थित होते.
चाैकट
पुन्हा कोणी नादाला लागणार नाही...
खाडे म्हणाले, महापालिका कर्मचारी किंवा पोलीस दुकानापर्यंत आल्यास वाद विकोपाला जाईल. मग मिरजेला दंगल नवी नाही. त्यांच्या वक्तव्यावर व्यापाऱ्यांनीही टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेल्या प्रशासनाला एकदा झटका द्यावा लागेल. मग पुन्हा कोण नादाला लागणार नाही, असेही वक्तव्य खाडे यांनी केले.