मिरजेत एटीएम फोडले, रखवालदाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:12 PM2017-09-27T16:12:51+5:302017-09-27T16:13:06+5:30
मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
मिरज - मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शहरातील प्रमुख रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. शिवाजी रस्त्यावर बँक आॅफ इंडियाची शाखा व एटीएम आहे. एटीएमवर रात्रपाळीला राजाराम जाधव हे रखवालदार होते. मध्यरात्री एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी जाधव यांच्या डोक्यात काठीने वार करून एटीएम यंत्र फोडले. मात्र एटीएममधील कॅश बॉक्स चोरट्यांना फोडता न आल्याने सुमारे दहा लाखांची रक्कम बचावली. सकाळी एटीएम यंत्र फोडल्याची व रखवालदार राजाराम जाधव याची हत्या झाल्याचे समजताच बँक अधिका-यांनी पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जाधव याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली काठी मृतदेहाजवळ होती. डोक्यात काठीच्या फटक्याने खुर्चीवर बसलेल्या ठिकाणीच जाधव याचा दुर्देवी मृत्यू झाला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेºयात दोन चोरटे एटीएम यंत्र फोडताना दिसून आले आहेत. रात्री एक ते तीनदरम्यान हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. एटीएम फोडून रखवालदाराच्या हत्येचे वृत्त समजताच सकाळी बँकेसमोर मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.