मिरजेत मीरासाहेब दर्गा उरूसाला आजपासून प्रारंभ
By admin | Published: May 24, 2014 12:26 AM2014-05-24T00:26:55+5:302014-05-24T01:02:08+5:30
दुकाने सजली : संगीत सभेत गायक-वादकांचा सहभाग
मिरज : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणार्या मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसास उद्या, शनिवार दि. २४ पासून प्रारंभ होत आहे. उरूसानिमित्त मानकर्यांच्याहस्ते दर्गा आवारात मंडप उभारणी करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी चर्मकार समाजातर्फे मानाचा पहिला गलेफ अर्पण करण्यात येणार आहे. दि. २५ ते २७ दरम्यान अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत सभेत किराना घराण्याचे गायक-वादक सहभागी होणार आहेत. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याचा यंदा ६३९ वाउरूस आहे. परंपरेप्रमाणे उरूसानिमित्त दर्ग्याच्या पटांगणावर मंडप उभारणी करण्यात आली आहे. गुलबर्गा येथील सुफी संत अफसर बाबा व मुस्तफा बाबा यांच्याहस्ते गंधलेप विधी होणार आहे. आज पहिल्या दिवशी चर्मकार बांधवांचा मानाचा गलेफ अर्पण केल्यानंतर उरूसाला सुरूवात होणार आहे. उरूसाच्या या मुख्य दिवशी पहाटे मानाचा गलेफ अर्पण झाल्यानंतर दि. २५ व २६ रोजी शासनाचा गलेफ, गंधरात्र व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दि. २५ रोजी संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत सभेची सुरूवात होत आहे. दर्गा संगीत सभेत यावर्षी उस्ताद बहाउद्दीन डागर (भोपाळ), ज्योती हेगडे (हुबळी), पंडित आनंद बदामीकर ( सोलापूर), पं. रघुनाथ नाकोड ( हुबळी), जावेद कादरी (हैदराबाद) यांचे सोलो-तबलावादन, संजीव चिमलगी, पं. चंद्रशेखर वझे (मुंबई), कृष्णेंदु वाडेकर (हुबळी), मीना फातर्फेकर, रेवती कामत (पुणे) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. किराना घराण्यातील देशभरातील दिग्गज गायक, वादक दर्गा संगीत सभेत हजेरी लावणार आहेत. दि. २७ रोजी दर्गा संगीत सभेचा समारोप होणार आहे. दोन आठवडे चालणार्या उरूसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरूसानिमित्त दर्गा इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मार्केट ते स्टेशन चौकापर्यंत रस्त्याच्या दुतफर् ा उरूसानिमित्त दुकाने थाटण्यात आली आहेत. मिरजेच्या ऊरुसात आकर्षण असलेले पाळणेही उभारण्यात आले आहेत. उरूसासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. (वार्ताहर)