Sangli: कडेगावच्या ॲग्रो कंपनीत १ कोटी १४ लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:23 PM2024-10-26T16:23:38+5:302024-10-26T16:23:58+5:30

मालाच्या चोरीसह परस्पर वसुली

Misappropriation of 1 crore 14 lakhs in an agro company of Kadegaon Sangli, a case against two  | Sangli: कडेगावच्या ॲग्रो कंपनीत १ कोटी १४ लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा 

Sangli: कडेगावच्या ॲग्रो कंपनीत १ कोटी १४ लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा 

सांगली : कडेगाव येथील शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील सन ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीत १ कोटी १४ लाख ८१ हजार ७२६ रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या कंपनीची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी संशयित विश्वनाथ जयवंत पवार (वय २५, रा. शिवाजीनगर ता. कडेगाव) आणि अमोल वसंतराव मोहिते (वय ३३, रा. सोहोली) या दोघांविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कंपनीचे डॉ. अभयसिंह शरद कदम (वय ३४, रा. सोनसळ) यांनी फिर्याद दिली आहे.

कडेगाव येथील शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये डॉ. अभयसिंह कदम यांची सन ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची पशुखाद्य निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये संशयित विश्वनाथ पवार हा विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरी करीत होता. तर संशयित अमोल मोहिते हा कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून काम करीत होता.

दरम्यान एप्रिल २०२२ पासून २५ जुलै २०२४ या कालावधीत वरील दोघा संशयित यांनी आपापसात संगनमत करून कंपनीने खरेदी केलेला कच्चा मालाची तसेच गहू, तांदूळ, पक्क्या मालाची चोरी केली. त्याची किंमत सुमारे ७८ लाख ९१ हजार ८०३ रुपये इतकी आहे. त्याचबरोबर कंपनीने विक्री केलेल्या मालाचे व्यापाऱ्यांकडून घेतलेले ३५ लाख ८९ हजार ८२३ रुपये जमा केले नाहीत.

दोघांनी एकूण १ कोटी १४ लाख ८१ हजार ७२६ रुपयांचा अपहार केला. हिशोब तपासणीत हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर डॉ. कदम यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे तपास करीत आहेत.

Web Title: Misappropriation of 1 crore 14 lakhs in an agro company of Kadegaon Sangli, a case against two 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.