सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:09 PM2022-12-07T18:09:55+5:302022-12-07T18:10:24+5:30
दलित वस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीचा मनमानीपणे वापर करून हा अपहार करण्यात आला आहे.
इस्लामपूर : लाडेगाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीमध्ये दलितवस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीमधून अंदाजे २५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी केला. याचवेळी त्यांनी हा अपहार करणाऱ्या तत्कालीन सरपंच व अधिकाऱ्यांकडून त्याची वसुली करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या अपहाराची माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली. वरील अपहाराची पुराव्यासहीत जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रथमदर्शनी सर्व पुरावे पाहून डुडी यांनी चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, घटना दुरुस्ती आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत. लाडेगावमध्ये दलित वस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीचा मनमानीपणे वापर करून हा अपहार करण्यात आला आहे.
काम न करता बिले काढणे, विकासकामांच्या मोजमापामध्ये फेरफार करणे, एलईडी बल्बची बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दराने खरेदी, गटार, रस्ते, पाइपलाइन, काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक, बंधारा दुरूस्ती, शाळा इमारत दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती, सदोष एमबी नोंदी, उपकार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीशिवाय बिले काढणे अशा पद्धतीने हा अपहार झाला आहे.
कोरोनाच्या काळात तत्कालीन सरपंच राजू पाटील, ग्रामसेवक डी. पी. सिंग, पं. स.चे निवृत्त अभियंता सूर्यवंशी यांचा यामध्ये सहभाग आहे. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी चौकशी करण्यापेक्षा चुका करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या सर्व संबंधितांवर कारवाईसाठी पाठपुरावा करत आहोत.
स्वखर्चाने दप्तर तपासणी..
बी. जी. पाटील यांनी माहिती अधिकारातील कायदेशीर हक्काचा वापर करत ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करण्यासाठी १ हजार रुपयांची अनामत रक्कम भरली. कायद्यानुसार दप्तराची तपासणी करण्यासाठी पहिला तास मोफत, तर पुढील प्रत्येक तासाला ५ रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाते. या कायदेशीर हक्काचा वापर करत पाटील यांनी हा अपहार पुराव्यासहीत समोर आणला आहे.