गर्भपात करणारी सात जोडपी ताब्यात
By admin | Published: March 18, 2017 12:33 AM2017-03-18T00:33:10+5:302017-03-18T00:33:10+5:30
खिद्रापुरे कोठडीत : आणखी एका औषध विक्रेत्यास अटक; कोल्हापूर जिल्ह्यातील तीन डॉक्टरांचे ‘रॅकेट’ निष्पन्न
सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणात मुलीचा गर्भ आहे म्हणून खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या सात जोडप्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दत्तात्रय गेलू भोसले (वय ३०, रा. मुंबई) या आणखी एका औषध विक्रेत्यास अटक करण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांच्या चौकशीतून कोल्हापूर जिल्ह्यातील तीन डॉक्टरही गर्भपाताचे ‘रॅकेट’ चालवित असल्याची माहिती पुढे आली आहे. अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह चौघांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
खिद्रापुरेला अवैध गर्भपातासाठी माधवनगर (ता. मिरज) येथे सुनील खेडेकर हा औषधांचा पुरवठा करीत होता. खेडेकरला यापूर्वीच अटक केली आहे; पण तोही या औषधांचा साठा मुंबईतील दत्तात्रय भोसले याच्याकडून घेत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यासाठी एक पथक मुंबईला रवाना केले होते. शुक्रवारी पहाटे त्यास अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
खिद्रापुरेला औषध पुरवठा केल्याप्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या औषध विक्रेत्यांच्या चौकशीत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन डॉक्टर गर्भलिंग तसेच गर्भपाताचे निदान करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित डॉक्टर पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्यावर कारवाईसाठी त्यांची नावे कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार आहेत. खिद्रापुरे याच्याकडे गर्भपात करणाऱ्या सात महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात पाचारण करून त्यांची चौकशी केली. चौकशीत त्यांनी डॉ. खिद्रापुरे याच्यामार्फत गर्भलिंग निदान व गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. कर्नाटकात गर्भलिंग चाचणी करणाऱ्या काही डॉक्टरांची नावे या प्रकरणात निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर कारवाईसाठी कर्नाटक आरोग्य विभागास पोलिस माहिती देणार आहेत.
अटकेतील खिद्रापुरे, मृत विवाहितेचा पती प्रवीण जमदाडे, एजंट यासीन तहसीलदार, सातगोंडा पाटील या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास अपूर्ण असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची पोलिसांंनी मागणी केली. पण न्यायालयाने त्यांची ही मागणी अमान्य करून न्यायालयाने चौघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला. गर्भलिंग निदान व गर्भपातप्रकरणी १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
जोडप्यांची चौकशी
पोटात वाढत असलेला गर्भ मुलीचा असल्याचे गर्भलिंग निदान तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर अनेक महिला पतीच्या मदतीने खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करण्यास येत असत. आतापर्यंत खिद्रापुरेने अनेक गर्भपात केल्याची माहिती पुढे येत असल्याने त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी गर्भपात केलेल्या महिलांचा व त्यांच्या पतींचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले होते. यामध्ये त्यांना यशही आले आहे. शुक्रवारी सात जोडप्यांना ताब्यात घेतले. त्यांची दिवसभर चौकशी सुरू होती. यातील महिलांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. त्यांना गर्भपात करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतींविरुद्ध पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.