अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील आणखी चार व्यापारीही रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:15 PM2017-12-12T16:15:04+5:302017-12-12T16:28:19+5:30
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे.
सांगली : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे.
कुरुंदकर व अश्विनी बिद्रे यांनी सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात एकत्रित नोकरी केली आहे. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने, त्यांची चांगली ओळख झाली. यातून त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली. दोघांची दोन-तीन महिन्यांच्या अंतराने सांगलीतून जिल्ह्याबाहेर बदली झाली.
कुरुंदकरने पालघर जिल्ह्यातील नवघर पोलिस ठाण्यात सेवा बजाविल्यानंतर त्याची ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली. अश्विनी बिद्रे यांची सांगलीतून रत्नागिरीला बदली झाली. तेथे दीड वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. पण त्या तिथे हजर झाल्याच नाहीत. गेले दीड वर्ष त्या बेपत्ता आहेत.
चार दिवसांपूर्वी कुरुंदकरला अटक झाल्याने, या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. कुरुंदकर यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात सेवा बजावली आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा कार्यभार तब्बल तीन वर्षे त्यांनी सांभाळला होता. त्यांची सांगली व कुपवाड परिसरातील नगरसेवक व व्यापाऱ्याशी चांगली ओळख होती. कुरुंदकरकडे त्यांची नेहमी उठ-बस असायची.
अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक, तसेच काही व्यापारी कुरुंदकरच्या संपर्कात होते, अशी माहिती कुरुंदकरच्या कॉल डिटेल्सवरुन पुढे आली आहे. त्या माहितीच्याआधारे नवी मुंबई पोलिसांचे पथक तपास करीत आहे.
सांगली आणि कुपवाडमधील चार व्यापाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ताचे कनेक्शन सांगलीपर्यंत आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
कुरुंदकरशी जवळीक
कुपवाड परिसरातील एका माजी नगरसेवकाची कुरुंदकरशी चांगली जवळीक होती. कुरुंदकरने या माजी नगरसेवकाचा फ्लॅट अश्विनी यांना सांगलीत राहण्यास दिला होता. तसेच अश्विनी बेपत्ता झाल्या, त्यावेळी हा माजी नगरसेवक कुरुंदकरच्या संपर्कात होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. या माजी नगरसेवकाला चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.