Sangli Crime: करगणीतील बेपत्ता मुले अखेर सापडली, जलद तपासामुळे आटपाडी पोलिसांचे होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:38 IST2023-03-17T13:35:10+5:302023-03-17T13:38:38+5:30
पोलिसांनी तात्काळ विविध पथके तयार करून तपासाला गती दिली

Sangli Crime: करगणीतील बेपत्ता मुले अखेर सापडली, जलद तपासामुळे आटपाडी पोलिसांचे होतंय कौतुक
लक्ष्मण सरगर
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील तीन शाळकरी मुले शाळेला जातो असे सांगून घरातून गेलेली मुले घरी न परतल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आटपाडी पोलिसांनी केलेल्या जलद तपासामुळे ही मुले सुखरुप सापडली. पोलिसांनी जलदगतीने तपास करून मुलांचा शोध घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शौर्य मारुती बोडरे (वय.१३), स्वप्नील बाळासो भोसले (१३) आणि प्रसाद सुभाष मंडले (१३, सर्व रा. आटपाडी) अशी या मुलांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, संबंधित तिघे मुले बुधवारी (दि.१५) शाळेला जातो असे सांगून घरातून गेली होती. मात्र घरीच परत न आल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर आटपाडी पोलिस ठाण्यात संबंधित मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ विविध पथके तयार करून तपासाला गती दिली होती.
आज, शुक्रवारी सकाळी शौर्य बोडरे, स्वप्नील भोसले आणि प्रसाद मंडले हे तिघे आटपाडी बस स्थानक येथे मिळून आली. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे पारवे पक्षी विकत घेण्याकरिता निघाले असल्याचे सांगितले. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. पथकामध्ये पोलिस उप निरीक्षक अजित पाटील, पो.हे.का.राकेश पाटील, पो.का.संभाजी सोनवणे यांनी सहभाग घेतला.