चुकीचा फलक लावल्याने उडाला गोंधळ; उद्यानात मंडप घातला जाईल ध्वनीक्षेपकही लावला जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:04 PM2020-02-12T17:04:18+5:302020-02-12T17:06:30+5:30
सांगली : महापालिकेच्या आमराई व महावीर उद्यान विवाह, वाढदिवसासाठी भाडेतत्वावर देण्याचा फलक लागल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पण ...
सांगली : महापालिकेच्या आमराई व महावीर उद्यान विवाह, वाढदिवसासाठी भाडेतत्वावर देण्याचा फलक लागल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पण प्रशासनाने चुकीचा फलक लावल्याने हा गोंधळ उडाला असून शहरातील नाना-नानी पार्क व सानेगुरुजी ही दोन उद्याने विवाह व वाढदिवसासाठी भाड्याने दिली जाणार आहे. इतर उद्यानात केवळ फोटोशुटसाठी शुल्क आकारले जाणार असल्याचे उद्यान अधिक्षक शिवप्रसाद कोरे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांत चुकीचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया नगरसेवकांतून व्यक्त होत आहे.
महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरातील उद्यानात विवाह, वाढदिवस, चित्रपट शुटींग, मेळावा, प्रदर्शन, स्वागत समारंभ, फोटोग्राफीसाठी शुल्क आकारले आहे. त्याला महासभेनेही मान्यता दिली आहे. त्यानंतर उद्यान विभागाकडून आमराई व महावीर उद्यानात नवीन शुल्काचे फलक लावण्यात आले. या फलकावर वाढदिवस, विवाह, स्वागत समारंभाच्या शुल्काचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. महावीर उद्यान व आमराई हे दोन्ही उद्याने मध्यवस्तीत आहेत. तिथे स्वागत समारंभ, वाढदिवसाला परवानगी दिल्यास त्याचा नागरिकांना त्रास होणार आहे. उद्यानात मंडप घातला जाईल ध्वनीक्षेपकही लावला जाईल. त्यामुळे नागरिकांना उद्यानात फिरणे मुश्किलीचे होणार आहे. तसेच भोजन, चहापानामुळे दुर्गंधी पसरले. परिणामी पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचा आक्षेप नागरिकांनी नोंदविला. महावीर उद्यान परिसरातील नागरिकांनी त्यासाठी सह्याची मोहिमही हाती घेतली आहे.
याबाबत उद्यान अधिक्षक शिवप्रसाद कोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महावीर उद्यान व आमराई या दोन्ही ठिकाणी स्वागत समारंभ, वाढदिवस, विवाह कार्यक्रमांना परवानगी नाही. तेथे चुकीचा फलक लावला आहे. शहरातील नाना-नानी पार्क व साने गुरुजी उद्यान याठिकाणी वाढदिवस, विवाह कार्यक्रमांना मान्यता आहे. महावीर उद्यान व आमराईत प्रिवेडिंग शुटींग, फोटोग्राफी यासाठी प्रतितास ५०० रुपये तर चित्रपट शुटींगसाठी प्रतिदिन १० हजार शुल्क आकारले जाणार आहे. या फलकामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला असून तो हटविला जाईल, असे स्पष्ट केले.