नरवाड ग्रामपंचायतीकडून शासकीय निधीचा गैरवापर
By admin | Published: March 28, 2016 11:42 PM2016-03-28T23:42:14+5:302016-03-29T00:25:37+5:30
जनसुविधा योजनेचा निधी : कारवाईसाठी पंचायत समितीचा जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर
मिरज : नरवाड (ता. मिरज) येथे जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीच्या कामाबाबत व अनुदानाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन मिरज पंचायत समितीने चौकशी अहवाल जि. प. प्रशासनास सादर केला आहे. चौकशीत दोषी आढळल्याने जि. प. प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
नरवाड येथे जनसुविधा योजनेअंतर्गत २०१३-१४ मध्ये स्मशानभूमीसाठी ५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. हे अनुदान दोन टप्प्यात ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आले आहे. स्मशानभूमी जागा खरेदी व बांधकामात निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार अरुण शिवराम कांबळे व अंकुश शिवराम नरवाडकर यांनी मिरज पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे केली होती. याची दखल घेऊन पंचायत समितीने केलेल्या चौकशीत स्मशानभूमी बांधकामाच्या निधीचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायतीने जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी न घेता स्मशानभूमी बांधकामासाठी मंजूर असलेल्या अनुदानातून १००० हजार चौरस फूट जागा परस्पर खरेदी करून जागा मालकास १ लाख १० हजार रुपये दिले आहेत. ५ लाख खर्चाच्या स्मशानभूमी बांधकामासाठी ई-निविदाव्दारे टेंडर मागणी करणे आवश्यक होते.
मात्र गावपातळीवर नोटीस प्रसिध्द करून निविदा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करीत मूल्यांकनाचे दाखले नसताना ठेकेदाराला १ लाख ६० हजार रुपये अदा केल्याने ग्रामविकास अधिकारी शिदगोंडा बाबूराव विटेकर व सरपंच भरत कुर्ले यांनी शासकीय निधीचा गैरवापर करून अपहार केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
शासकीय निधीच्या गैरव्यवहार व अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी विटेकर यांना प्रशासकीय कारवाईसाठी शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली होती. विटेकर यांनी दिलेला खुलासा समर्थनीय नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी व जनसुविधा निधीचे व्यवहार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त सहीने असलेने सरपंच भरत कुर्ले यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात कुचराई केल्याने तेही कारवाईस पात्र ठरतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मिरज पंचायत समिती प्रशासनाने कारवाईसाठी चौकशी अहवाल केल्याने जि. प. प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (वार्ताहर)
‘नरवाड येथील जनसुविधा योजनेतंर्गत स्मशानभूमी बांधकामासाठी पाच लाखांचा निधी मंजूर आहे. या निधीचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी आल्याने चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत निधीचा गैरवापर झाल्याचे आढळून येत असल्याने दोषींवर कारवाईसाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.
- रवींद्र कणसे
गटविकास अधिकारी
स्मशानभूमी बांधकामासाठी प्रस्ताव सादर करताना ग्रामपंचायतीने शासनाची दिशाभूल केल्याचेही स्पष्ट झाले आहे. शासकीय निधी खर्चासाठी जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायतीने सादर केलेल्या ७/१२ उताऱ्याचे अवलोकन करता ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याची सिध्द होत नसल्याचे चौकशीत आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे.