मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:06 IST2025-02-20T16:06:29+5:302025-02-20T16:06:51+5:30
सांगलीकरातून संतप्त प्रतिक्रिया

मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग
सांगली : महापालिका क्षेत्रातील मैलामिश्रीत शेरीनाल्याचे पाणी गेल्या चार दिवसांपासून सांगलीत थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासन किती दिवस दुर्लक्ष करणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष असल्याबद्दल नागरिकांनी बुधवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याला सात ते आठ दिवसांपासून दुर्गंधी येत आहे. नदीकाठचे नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
सांगली शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय गंभीर निर्माण झाला आहे. सांगली बंधाऱ्यामुळे नदीपात्रातील पाणी थांबून आहे. पाणी वाहते नसल्यामुळे त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. शिवाय शेरीनाल्याचे सांडपाणीही वर्षानुवर्षे नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष नाही. शेरीनाल्यावरील चारही पंप सुरू असले, तरीही काही प्रमाणात सांडपाणी शेरीनाल्यावरून नदीत मिसळते.
गेली ३५ ते ४० वर्षे सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न चर्चेत आहे. अनेकजण आमदार, खासदार झाले; पण शेरीनाल्यापासून सांगलीकरांची मुक्तता कोणीही केली नाही. सांगलीकरांच्या आरोग्याशी, जिवाशी खेळ सुरू आहे. त्याचे राजकीय नेतृत्वाला काही देणे-घेणे नाही. कृष्णा नदीची सांगलीत गटारगंगा केलेली आहे, आता दुर्गंधीही पसरलेली आहे.
प्रदूषण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सर्जेराव पाटील
नवीन पुलाच्या वरच्या बाजूस पंपिंग स्टेशन आहे. तिथपासून ते सांगली बंधारामधील पाणी वापरासाठी उचलले जात असले, तरी शेरीनालामधून पाणी नदीत सोडले जाते. तसेच, काही पाणी नदी काठावरून बंधारा खाली सोडले जाते. परंतु, गेली कित्येक दिवस शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला मिसळत आहे. म्हणून, पाण्याला दुर्गंधीचा वास येत असल्याचे प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांना फोनवरून १८ फेब्रुवारी २०२५ रोजी कळवले होते. पण, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिली.