एमजेपी, ठेकेदाराने हात झटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:39 PM2018-06-01T23:39:11+5:302018-06-01T23:39:11+5:30
सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार व सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हात झटकले आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी दोघांनीही महापालिकेवर टाकली असून महापालिकेनेच सुरक्षेची व्यवस्था ठेवून अधिकाºयांमार्फत निरीक्षण न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा पत्राद्वारे खुलासा केला आहे.
कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा पाटील कुस्ती आखाड्याजवळ महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात २६ मे रोजी दोन कर्मचाºयांचा मृत्यू झाला. ठेकेदाराकडे काम करीत असलेला कंपनीचा अभियंता उमाकांत देशपांडे आणि विठ्ठल शेरेकर या कर्मचाºयाचा इंटकवेलमध्ये गॅसने गुदमरून व सांडपाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या दोन कर्मचाºयांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्यावतीने संबंधित ठेकेदार आणि सल्लागार कंपनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या दुर्घटनेबाबत संबंधित ठेकेदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उलटाच पवित्रा घेतला आहे. या केंद्राचे काम हे योजनेतच नाही. शिवाय हे मलनिस्सारण केंद्र आणि ज्या इंटकवेलमध्ये दुर्घटना घडली ते महापालिकेच्या मालकीचे आहे. त्याची दुरुस्ती ठेकेदार कंपनी करीत आहे. जीवन प्राधिकरणने तर, त्याच्यावर सल्लागार म्हणून आमचा संबंधच नाही, असे पत्राद्वारे कळविले आहे. दुसरीकडे महापालिकेच्या सक्षम अधिकाºयांनी सुरक्षेची व्यवस्था करून तसेच समक्ष थांबून हे काम करून घेतले नाही. याला महापालिकाच जबाबदार आहे, असे ठेकेदार कंपनीने कळविले आहे.
दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तर, सल्लागार म्हणून आमच्याकडे २०१२ ते २०१७ पर्यंतच जबाबदारी होती. त्यानंतर आम्ही तोंडी चर्चेने सल्लागार म्हणून काम पाहत आहोत. आमची जबाबदारीच संपली आहे, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कारवाई होणारच : उपाध्ये
महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये म्हणाले, अभियंता आणि कर्मचारी मृत्यूप्रकरणी आयुक्तांच्या लेखी आदेशानुसारच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. वास्तविक यापूर्वी सांगलीवाडीतील दुर्घटनेत ठेकेदार आणि सल्लागार एजन्सी एमजीपीने खबरदारी न घेतल्याने एका कर्मचाºयाचा भराव कोसळून बळी गेला होता. त्यावेळीही खबरदारीची सूचना दिली होती. त्यानंतरही दखल न घेतल्याने पुन्हा दुर्घटना घडली व दोघांचे बळी गेले. ड्रेनेज योजनेचाच भाग म्हणून मलनिस्सारण केंद्राची दुरुस्ती सुरू आहे. ते ठेकेदाराकडे दुरुस्तीसाठी वर्ग करण्यास एमजीपीनेही मान्यता दिली आहे. तशी पत्रेही महापालिकेकडे आहेत. त्यामुळे या दोघांना जबाबदारी टाळता येणार नाही. कारवाईला समोर जावे लागणारच आहे.
काम थांबविण्याचा इशारा
दोन कर्मचाºयांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार व एमजेपीने जबाबदारी झटकली आहे. महापालिकेने कारवाईचा रेटा सुरू ठेवला तर ड्रेनेज योजनेचे काम थांबवू, आम्हाला यात गुंतवू नका, असा इशाराही दिला आहे. ठेकेदार व एमजेपीच्या भूमिकेमुळे अपुºया ड्रेनेज योजनेच्या पूर्णत्वाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. २०१२ मध्ये ड्रेनेज योजनेचे काम सुरू झाले. पण आता सहा वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही. सातत्याने ठेकेदाराला मुदतवाढ, भाववाढ देण्यात आली. प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाºयांनी नेहमीच ठेकेदाराची बाजू घेतली होती.