शिंदे गटातील आमदार अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 11:43 AM2022-12-26T11:43:31+5:302022-12-26T11:45:09+5:30

'खानापूर मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणायचा'

MLA Anil Babar will not contest the 2024 elections says MLA Gopichand Padalkar | शिंदे गटातील आमदार अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट

शिंदे गटातील आमदार अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

दिलीप मोहिते 

विटा (सांगली) : मी २०१९ ला बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित होतो. त्यावेळी आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी बारामतीच्या क्लब हाऊसमधील पहाटेच्या बैठकीत मला २०२४ ला तुमच्या पाठीशी राहत असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द आता ते पिता-पुत्र पाळतील. त्यामुळे बाबर हे खानापूर मतदारसंघात २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

मोही (ता.खानापूर) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभासाठी आले असता त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत बारामती येथे आ. बाबर, अमोल बाबर यांच्यात पहाटे झालेल्या गोपनीय बैठकीचा उलघडा केला.

आमदार पडळकर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळेच २०१९ ला आमदार झाले आहेत. मी बारामतीमधून निवडणूक लढवित असताना बाबर व त्यांचे जेष्ठ पूत्र अमोल बाबर हे पहाटे पाच वाजता बारामतीत क्लब हाऊसला मला भेटण्यासाठी आले होते.

त्यावेळी अमोल बाबर यांनी अनिलभाऊंचे वय झाले आहे. त्यामुळे आमची आता ही शेवटचीच निवडणूक असल्याने कसल्याही परिस्थितीत २०१९ ला अनिलभाऊंना आमदार करा. पुढील २०२४ च्या निवडणूकीत आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, असा शब्द बाबर पिता-पुत्राने दिला होता. त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी आता गडबड करू नये. मी त्यांचे काम केले आहे.

या बारामती बैठकीतील शब्दाबाबत बाबर पिता-पुत्र मतदारसंघातील लोकांना सांगतील, असे मला वाटले होते. मात्र, त्यांच्याकडून काहीही सांगितले जात नसल्याने लोकांना माहित असावे म्हणून एवढ्या दिवसानंतर मलाच सांगण्याची वेळ आली आहे. मात्र, २०२४ ची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवायची आहे व आ. बाबर, अमोल बाबर आणि सुहास बाबर यांच्या पाठींब्यावर खानापूर मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणायचा आहे.

खानापूर मतदारसंघातील संघर्षाच्या राजकारणाला यापुढे मूठमाती देऊन चुकीचे राजकारण चुलीत घालून चांगल्या राजकारणाबरोबर आपल्याला जायचे आहे. मात्र, बाबर पिता-पुत्रांनी दिलेल्या शब्दानुसार खानापूर मतदारसंघात आ. अनिल बाबर २०२४ ची निवडणूक लढविणार नाहीत, असा पुर्नउच्चारही आ. गोपीचंद पडळकर यांनी केला.

Web Title: MLA Anil Babar will not contest the 2024 elections says MLA Gopichand Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.