Sangli Politics: राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकरांची खेळी, अंतिम आदेश हायकमांडचा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 05:14 PM2024-01-01T17:14:25+5:302024-01-01T17:15:12+5:30
आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले?
दिलीप मोहिते
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२४ साठी शड्डू ठोकला आहे. त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी २०२४ चा आमदार आटपाडी तालुक्याचाच असे सांगत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे नाव पुढे आणले आहे. आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. मात्र, देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पडळकर बंधू आमदारकीवर निशाणा साधणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गत निवडणुकीत पडळकर बंधूंनी आमदार अनिल बाबर यांना मदत केली होती. परंतु, निवडणुकीनंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप करीत त्यांनी आमदार बाबर यांना लक्ष्य केले. आमदार पडळकर जाहीर सभेत आमदार बाबर उपस्थित असतानाही त्यांचे नाव न घेता थेट विरोध करीत आहेत.
ब्रम्हानंद पडळकरांनी तर थेट राजेंद्रअण्णा देशमुख यांचे नावच २०२४ साठी जाहीर करून टाकले आहे. परवा विट्यात त्यांनी आमदार बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना दोन वेळा सहकार्य करणाऱ्या देशमुख यांना २०२४ ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
वास्तविक विधानसभेसाठी पडळकरांनी स्वत:ची उमेदवारी यापूर्वी जाहीर केली आहे. मग आता देशमुख यांच्या नावाची घोषणा कशी झाली? असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र, देशमुख यांचे नाव जाहीर केले असले तरी उमेदवारी पडळकरांचीच राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पडळकर बंधूंनी देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दोघांपैकी एकाने आमदारकीवर निशाणा साधण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विसापूर सर्कलपासून गावोगावी भेट देऊन ताकद वाढविण्याचे काम सुरू केले आहे.
अंतिम आदेश हायकमांडचा..
आमदार पडळकर यांनी खानापूरसह जतच्या जागेसाठीही फिल्डिंग लावल्याचे समजते. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला खानापूरची जागा मिळणार असल्याचे निश्चित समजले जाते. त्यावेळी मित्रपक्षाच्या उमेदवाराचाच प्रचार करण्याचा आदेश भाजपचे हायकमांड देऊ शकतात. हायकमांडचा अंतिम आदेश आल्यास पडळकर बंधू काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.