Sangli Politics: गोपीचंद पडळकर विधानसभा कोठून लढणार ?, ब्रह्मानंद पडळकर यांचीही ‘होम पिच’वर चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:51 PM2024-05-27T17:51:16+5:302024-05-27T17:51:40+5:30

शिंदेसेना अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित  

MLA Gopichand Padalkar's preparations for the upcoming assembly elections | Sangli Politics: गोपीचंद पडळकर विधानसभा कोठून लढणार ?, ब्रह्मानंद पडळकर यांचीही ‘होम पिच’वर चाचपणी

Sangli Politics: गोपीचंद पडळकर विधानसभा कोठून लढणार ?, ब्रह्मानंद पडळकर यांचीही ‘होम पिच’वर चाचपणी

लक्ष्मण सरगर

आटपाडी: भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचेही बोलले जात आहे; मात्र ते होम पिच असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार की जतमधून ? हे अद्याप अस्पष्ट आहे; मात्र त्यांनी १ जूनपासून जत तालुक्याचा दौरा निश्चित केला असून जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपाचे स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे सदस्य आहेत. जत विधानसभा मतदारसंघात धनगर, लिंगायत व बहुजन समाजाची संख्या मोठी आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लाेकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपाकडे सध्या सर्व समाजाला एकसंघ ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही. त्यामुळे जतमधून विधानसभा लढण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची चाचपणी सुरू आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून होम पिच असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघाबाबत पडळकर काय भूमिका घेणार ? हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 

महायुती झाल्यास नेमका मतदारसंघ कोणाला मिळणार ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शिंदेसेनेकडे मतदारसंघ कायम राहिल्यास पडळकर यांची भूमिका कोणती राहणार ? हेही स्पष्ट नाही. कारण दिवंगत आमदार अनिल बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या निवडणुकीत बाबर यांच्या विजयात पडळकरांनी मोठे योगदान दिले होते; मात्र यानंतर २०१९ ची चूक सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीररित्या अनेक कार्यक्रमामध्ये बोलून दाखवले आहे.

आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघातील परिस्थिती बदलली असली तरी शिंदेसेना पुन्हा मतदारसंघावर दावा करत अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. गोपीचंद पडळकर जर जतमधून लढणार असतील तर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर खानापुरातून लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गोपीचंद पडळकर हे कोणत्या मतदारसंघातून लढणार ? यावरच खानापूर विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

Web Title: MLA Gopichand Padalkar's preparations for the upcoming assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.