'आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:13 PM2022-11-21T16:13:45+5:302022-11-21T16:14:37+5:30
मत आमचे, सत्ता तुमची हे समीकरण चालणार नाही.
इस्लामपूर : काँग्रेस व भाजप एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस, शिवसेनेकडे आघाडीसाठी प्रस्ताव पाठवू नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपुरात आजअखेर उभा राहिला नाही. त्याची किंमत जयंत पाटील यांना चुकवावी लागेल. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी दिला.
इस्लामपुरात रविवारी डीपीआयचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन झाले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, संदीप ठोंबरे, अशोकराव आगावणे, एस. के. येवळे, मोहन मदने, अशोक वायदंडे, नंदकुमार नांगरे, सोहम लोंढे, रमेश चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. कांबळे म्हणाले, बहुजन समाजातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी डीपीआय लढणार आहे. साडेतीन टक्के लोकांची देशात सत्ता येत असेल तर ८५ टक्के लोकांनी भिकेचे कटोरे घेऊन फिरायचे नाही. मत आमचे, सत्ता तुमची हे समीकरण चालणार नाही.
वामन मेश्राम म्हणाले. आज कधीही विकला न जाणारा समाज बनवावा लागेल. राज्यात आंबेडकरवादी विचाराच्या पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. उद्देश व विचारधारा स्पष्ट पाहिजे, तरच उपेक्षित समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहात येईल.
यावेळी अजिंक्य चांदणे, अशोक वायदंडे, सोहम लोंढे, संदीप ठोंबरे, एस. के. आयवळे, मोहन मदने यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे स्वागत केले. सतीश लोंढे, दिलीप कुरणे, कबीर चव्हाण, सूरज वाघमारे, शंभू बल्लाळ, मानसिंग बल्लाळ, सुनील घेवदे, विशाल नांगरे यांनी संयोजन केले.
अधिवेशनातील ठराव..!
अधिवेशनात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. मागासवर्गीय विकास महामंडळांना २ हजार कोटींची तरतूद करावी. सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोग पुनर्गठित करून शिफारशी लागू कराव्यात. शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करावे. गायरान जमिनीवरील शेती व वसाहती कायम कराव्यात. नरवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, असे ठराव करण्यात आले.