Sangli News: जयंत पाटलांची सहकारातून एक्झिट; 'राजारामबापू'ची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:26 PM2023-02-06T16:26:07+5:302023-02-06T16:52:42+5:30

जयंतरावांच्या सहकार क्षेत्रातील एक्झिटमुळे एकच खळबळ

MLA Jayant Patil shocking decision, exit from the cooperation; Rajarambapu factory election unopposed | Sangli News: जयंत पाटलांची सहकारातून एक्झिट; 'राजारामबापू'ची निवडणूक बिनविरोध

Sangli News: जयंत पाटलांची सहकारातून एक्झिट; 'राजारामबापू'ची निवडणूक बिनविरोध

Next

युनूस शेख

इस्लामपूर : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर आणि नावलौकिक असणाऱ्या येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. मात्र नव्या पिढीकडे सत्तेची सूत्रे सोपवताना सहकारातील प्रगाढ ज्ञान प्राप्त केलेल्या माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आणि आज तो अंमलातही आणल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. जयंतरावांच्या सहकार क्षेत्रातील एक्झिटमुळे एकच खळबळ उडाली.

उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह प्रदीपकुमार पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, दादासाहेब मोरे आणि मेघा मधुकर पाटील या आठ जुन्या संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर नव्या चेहऱ्यात युवा नेते प्रतिक पाटील, दीपक पाटील, शैलेश पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, बबन थोटे, रघुनाथ जाधव, योजना सचिन पाटील, आप्पासाहेब हाके, हणमंत माळी आणि राजकुमार कांबळे यांचा समावेश आहे.

सहकार क्षेत्रातील एका कारखान्याच्या चार शाखा काढत देशाच्या पातळीवर विक्रम नोंदविण्याची कामगिरी राजारामबापू कारखान्याने केली आहे. याचे सर्व श्रेय जयंत पाटील यांना जाते. बापूंच्या निधनानंतर १९८४ साली वाळवा तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात आलेल्या जयंत पाटील यांनी आपली सुरुवात सहकारातून केली. त्यावेळची पाण्याची परिस्थिती पाहून आणि बापूंनी त्यांच्या कारकिर्दीत घेऊन ठेवलेले पाणी परवाने वापरात आणण्यासाठी पदयात्रा काढत जयंतरावांनी अवघ्या समाजमनावर आपल्या प्रतिमेचे गारूड उभा करण्यात यश मिळविले. 

त्यानंतर थेट कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर तेव्हापासून अत्याधुनिकीकरणाकडे सुरू झालेला राजारामबापू कारखान्याचा प्रवास आजही अखंडपणे टिकून आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प, अर्कशाला, असिटोन निर्मिती त्यानंतर आता इथेनॉल असा उपपदार्थ निर्मितीच्या संकल्पनाही खुद्द जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेल्या.

आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रे नव्या आणि तिसऱ्या पिढीतील युवा नेते प्रतिक पाटील यांच्याकडे सोपविली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांना त्यांची कामगिरी उत्कृष्टपणे करताना निर्णय प्रक्रियेतही खुलेपणा रहावा असा विचार करून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच नव्या रक्ताला वाव देण्यासाठी मी स्वतः थांबणार आहे असे सांगत अनेक सहकाऱ्यांना अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यातच थांबवले होते. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जयंत पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत सर्वांनाच धक्का दिला.

Web Title: MLA Jayant Patil shocking decision, exit from the cooperation; Rajarambapu factory election unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.