मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांनी दिलेल्या निकालावर आमदार पडळकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 05:15 PM2023-01-27T17:15:20+5:302023-01-27T17:15:46+5:30
..त्यामुळे आमच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये.
सांगली : मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. भावाच्या नावावरील प्लाॅटचा कब्जा तहसीलदारांनी मान्य केला आहे. त्यामुळे आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत दिला.
मिरजेतील जागेबाबत तहसीलदारांनी निकाल दिल्यानंतर त्यावर ते बोलत होते. ते म्हणाले की, माझे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावावर ७८४/१ (अ) मधील ४९ गुंठे जागा आहे. महापालिकेने नोटीस बजावल्याने या जागेतील अतिक्रमण पाडण्यात आले. जागेबाबत वाद निर्माण झाल्याने तहसीलदारांसमोर सुनावणी झाली. त्यांनी आज निकाल दिला.
सि. न. ७८४/१ (अ)मधील जागेचा कब्जा भावाच्या नावावर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. इतर १७ मिळकतधारकांचा कब्जा ७८४/१ (ब) व ७८३ जागेवर आहे. त्यामुळे आमच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये. मिळकतधारकांनी तहसीलदारांच्या निकालाचा अभ्यास करावा. हा निकाल आम्हालाही मान्य आहे. त्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रश्नच नाही. अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करू. तसेच जिल्हा पोलिसप्रमुखांनाही निवेदन देणार असून, पोलिस बंदोबस्तात जागेचा ताबा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.