आमदार रोहित पाटीलांनी जनतेला साक्ष ठेवून, सत्यजित देशमुख अन् सुहास बाबर यांनी कशी घेतली शपथ.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 03:49 PM2024-12-09T15:49:47+5:302024-12-09T15:51:01+5:30
तासगाव : महाराष्ट्र विधिमंडळात राज्यातील सर्वांत तरुण आमदार ठरलेले तासगाव - कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी रविवारी आमदार म्हणून ...
तासगाव : महाराष्ट्र विधिमंडळात राज्यातील सर्वांत तरुण आमदार ठरलेले तासगाव - कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी रविवारी आमदार म्हणून शपथ घेतली. राज्यातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून रोहित पाटील यांनी शपथविधी पूर्ण केला.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी शरद पवार गटातून रोहित पाटील विजयी झाले होते. त्यांच्या कुटुंबातील वडील माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, आई माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यानंतर रोहित पाटील हे तिसरे आमदार ठरले आहेत. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झाल्याने राज्यातील सर्वांत तरुण आमदाराचा रेकॉर्ड त्यांच्या नावाने झाला आहे.
रविवारी विधिमंडळात आमदार रोहित पाटील यांनी मी ''नव महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून, मी रोहित सुमन आर. आर. पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो'', अशी सुरुवात करून रोहित पाटील यांनी शपथविधी पूर्ण केला.
आई-वडिलांचे स्मरण करत सुहास बाबर यांनी घेतली शपथ
सांगली : खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिंदेसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांनी रविवारी मुंबई विधानभवनमध्ये आमदारपदाची गोपनीयतेची शपथ घेतली.
सुहास बाबर यांनी शपथ घेत असताना सुरुवातीस वडील अनिल बाबर व आई शाेभाकाकी बाबर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. सुहास यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त केले. शपथ घेताना ते म्हणाले की, विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने मी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे, अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन,’ अशी त्यांनी शपथ घेतली.
खानापूर-आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील यांचा पराभव केला व पहिल्याच प्रयत्नात त्यांना आमदारकी मिळविण्यात यश आले. विधान भवन मुंबई येथे आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी सुहास बाबर यांच्यासह शिंदेसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमधून घेतली शपथ
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांनी मुंबई विधानभवनमध्ये आमदार पदाची गोपनीयतेची शपथ घेतली. सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.
सत्यजित यांनी शपथ घेत असताना सुरुवातीस शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शिराळा व वाळवा तालुक्यांतील जनतेचे आभार व्यक्त करत, शिराळा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यानंतर मी सत्यजित सरोजिनी शिवाजीराव देशमुख असे म्हणून संस्कृतमधून शपथ घेतली. शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख २२ हजारांहून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. विधानभवन मुंबई येथे आमदाराचा शपथविधी पार पडला.
यावेळी सत्यजित देशमुख यांच्या कुटुंबातील पत्नी रेणुकादेवी देशमुख, बहीण डॉ. शिल्पा देशमुख यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक, प्रतापराव यादव, आनंदराव पाटील, भोजराज घोरपडे, स्वप्निल देशमुख, सुदाम पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.