' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:22 PM2023-09-09T17:22:27+5:302023-09-09T17:23:15+5:30
कार्यकर्त्यांना होतेय आर. आर. पाटलांची आठवण
दत्ता पाटील
तासगाव : राष्ट्रवादीच्या फुटीनंतरदेखील पक्षाध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जाेमाने काम सुरू केले आहे. पवारांचा पक्षबांधणीचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर फिरणाऱ्या आमदार रोहित पवार यांना आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी साथ दिली आहे. या दोघांनी ‘साहेबांचा संदेश’ घेऊन राज्यभर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांचे भाषण ऐकताना आर. आर. पाटील यांची आठवण येत असल्याचे सभेला उपस्थित राहणाऱ्यांचे म्हणणे आहे. आमदार रोहित पवारांच्या साथीने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षीय नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आबांचा पठ्ठ्या महाराष्ट्र पिंजताना दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी चांगली संधी होती. मात्र, आर. आर. पाटील यांच्या विचारांशी बांधिल राहत शरद पवारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय आबा कुटुंबीयांनी घेतला. वर्षानुवर्षे शरद पवारांशी एकनिष्ठ असणारेदेखील फारकत घेत सत्तेच्या लाटेवर स्वार झाले. मात्र, अशा परिस्थितीतही शरद पवारांकडून वेळोवेळी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. नुकतेच जालना येथे झालेल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने आर. आर. पाटील यांचा गृहमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले.
आबांचा वारसा घेत त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी जाेमाने काम सुरू केले आहे. आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील या युवा नेत्यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. आतापर्यंत कोल्हापूर, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी सभा घेण्यात आल्या. मात्र, यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी ज्युनिअर आर. आर. मैदानात उतरल्याचे चर्चा व चित्र दिसत आहे.
कार्यकर्त्यांना होतेय आर. आर. पाटलांची आठवण
सामान्य माणसाच्या थेट काळजाला भिडणारे बोलणे, भाषणाची लकब हुबेहूब आर. आर. पाटील यांच्यासारखीच. ऐकणाऱ्याला आर. आर. पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही, अशा शैलीत रोहित पाटील भाषण करीत आहे. यामुळे सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना व कार्यकर्त्यांना आर. आर. पाटलांची आठवण येत असल्याचे बोलले जातेय.