गांधी जयंतीपासून आमदार सुमनताईंचे बेमुदत उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:49 PM2023-09-29T15:49:38+5:302023-09-29T15:50:15+5:30
तासगाव : सावळजसह परिसरातील आठ गावे ही अनेक वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय ...
तासगाव : सावळजसह परिसरातील आठ गावे ही अनेक वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या आठ गावांचा योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी गांधी जयंतीपासून (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या उपोषणात त्यांच्यासोबत आठ गावांतील शेतकरीही सहभागी होणार आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ या कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक लागलेल्या मतदारसंघातील सावळज, सिद्धेवाडी, दहीवडी, जरंडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी आणि डोंगरसोनी ही आठ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून गेली अनेक वर्षे वंचित आहेत. या आठ गावांचा टेंभू योजनेत समावेश करून त्यांना हक्काचे पाणी देण्याची मागणी केलेली आहे. टेंभूच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.