महायुतीतील 'जनसुराज्य शक्ती'ने सांगलीतील 'या' विधानसभा मतदार संघावर केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 05:24 PM2024-08-17T17:24:26+5:302024-08-17T17:28:19+5:30
मिरज : आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज व जत जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी ...
मिरज : आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज व जत जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. मिरज व जत विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन कोरे यांनी केले.
जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मिरज शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध केल्याबद्दल विनय कोरे व समित कदम यांचा सत्कार करण्यात आला. जनसुराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक व विधानसभेत पाठविण्याची मागणी समित कदम यांनी विनय कोरे यांच्याकडे केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागितली नाही. मात्र, विधानसभेला जनसुराज्य पक्षाकडून जागांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
मिरज व जत विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करून या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याचे विनय कोरे यांनी सांगितले. यावेळी जनसुराज्य शक्ती जिल्हाप्रमुखपदी आनंदसागर पुजारी, सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी डॉ. पंकज म्हेत्रे, युवा शहर जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ रोहिले, युवक जिल्हाध्यक्षपदी सुशांत काळे, जिल्हा उपप्रमुखपदी चैतन्य कलकुटगी, जिल्हा संघटकपदी सलीम पठाण, शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल डोंगरे, सुमित भोसले, तुषार भोसले, ओंकार जाधव, अलीम पठाण, योगेश दरवंदर, कासम मुल्ला, सुनील बंडगर आदी उपस्थित होते.