पालिकेच्या निधीत आमदार, खासदारांचा हस्तक्षेप
By admin | Published: December 3, 2015 11:26 PM2015-12-03T23:26:23+5:302015-12-03T23:55:26+5:30
‘नियोजन’चा निधी रोखला : सभापतींसह नगरसेवक मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
सांगली : महापालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या विविध निधीत आता भाजपच्या आमदार, खासदारांनी हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेकडून दर्जेदार कामे होत नसल्याचे सांगत पालिकेच्या निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज आहे. बांधकाम विभागाकडूनच कामे करणार असाल, तर आमच्या ठरावाची गरजच काय?, असा सवाल स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केला आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी सभापती पाटील यांच्यासह नगरसेवक जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेणार आहेत.
शहरातील विकासकामे महापालिकेमार्फत केली जातात. आजअखेर या विकास कामांत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केलेला नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. या निधीत पालिकेचा हिस्सा घालून विकासकामे करण्यात आली. ही सर्व कामे पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत झाली. त्यात कधीच वाद झाला नाही. पण आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेला नव्या नियमांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यात पालिकेत काँग्रेसची सत्ता असल्याने भाजपचे आमदार व खासदारांचा विकास कामांतील हस्तक्षेप वाढला आहे.
जिल्हा नियोजन समितीतून मागासवर्गीय व दलित वस्तीसाठी पाच कोटीचा निधी आला आहे. या निधीतून करावयाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. तसे आमदार व खासदारांनी सुचविले आहे. त्यासाठी महापालिकेचा ठराव देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास पालिकेचीही हरकत नाही. पण कामाचे प्राधान्य कोण ठरविणार? हा प्रश्न आहे. आमदार, खासदार व त्यांच्या समर्थकांना वाटणारी कामे या निधीतून करावयाची, की नगरसेवकांनी सुचविलेली कामे करायची, यावर वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची कामे होणारच नसतील, तर आमचा ठराव कशासाठी हवा? तुम्हीच कामे निश्चित करा व निधी खर्च करा, असा पवित्रा सभापती संतोष पाटील व नगरसेवकांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करून घेण्यासही सभापतींनी हरकत घेतलेली नाही. पण महापालिका सुचवेल ती कामे होणार असतील, तर आक्षेप नाही, असा मुद्दाही त्यांनी बोलताना मांडला. यासाठी मंगळवारी सभापती पाटील, नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)
निधी पालिकेचा : कामे बांधकामकडे
महापालिकेकडून दर्जेदार कामे होत नसल्याचे सांगत पालिकेच्या निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज आहे. बांधकाम विभागाकडूनच कामे करणार असाल, तर आमच्या ठरावाची गरजच काय?, असा सवाल स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केला आहे. निधी महापालिकेचा आणि कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा आमदार, खासदारांचा अटास कशासाठी, असाही त्यांनी सवाल केला आहे.