आमदारांनी सुचवली 9.5 कोटींची कामे
By admin | Published: July 23, 2014 10:52 PM2014-07-23T22:52:00+5:302014-07-23T22:59:54+5:30
वेध निवडणुकीचे : तीन महिन्यांचा कालावधी
सांगली : विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदारांची धडपड सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्षाचा सर्व विकास निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील ८ आमदारांनी गेल्या तीन महिन्यांत प्रशासनाला ९ कोटी ५० लाखांची कामे सुचवली आहेत. आणखी १ कोटी ४८ लाखांचा निधी शिल्लक आहे. त्यातीलही कामे येत्या पंधरवड्यात सुचवली जाण्याची शक्यता आहे.
आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रत्येकी २ कोटींचा निधी दिला जातो. २०१४-१५ मधील आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा सदस्यांना १६ कोटींचा निधी मिळालेला आहे. त्यातील ५ कोटी २ लाखांचा निधी हा गेल्यावर्षीच्या अर्धवट राहिलेल्या कामांवर खर्च होत आहे. उर्वरित १० कोटी ९८ लाख रुपयांपैकी ९ कोटी ५० लाख रुपयांच्या कामाचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. आमदारांनी सुचवलेल्या कामांना आता जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्याचे काम आता सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)
४एप्रिल ते आतापर्यंत गेल्या साडेतीन महिन्यांत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या विकास निधीतील आणखी केवळ १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे.
४विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निधी खर्च करण्याचा आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विशेषत: गेल्या महिन्याभरात आमदारांकडून जिल्हा प्रशासनाकडे मोठ्याप्रमाणात कामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.
४येत्या पंधरवड्यात या निधीतून विविध विकासकामे सुचवली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी यांनी सांगितले की, आमदारांनी विकासकामे सुचवल्यानंतर प्रशासनातर्फे त्याला मंजुरी दिली जाते. त्या-त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सुचवून मंजुरी घ्यावी लागते. यावर्षी आचारसंहितेमुळे थोडासा विलंब झाला आहे. त्याला आता गती आली आहे.
४ही मंजुरी घेतल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्या अवधित हे काम पूर्ण केले जाऊ शकते. आतापर्यंत चालू वर्षात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी १ कोटी २६ लाखांची, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २ कोटी ३० लाखांची, आ. मानसिंगराव नाईक यांनी २ कोटी ४८ लाखांची, आ. संभाजी पवार यांनी २ कोटी ४५ लाखांची, आ. सुरेश खाडे यांनी २ कोटीची, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ३७ लाखांची, आ. सदाशिवराव पाटील यांनी दीड कोटीची व आ. प्रकाश शेंडगे यांनी तीस लाखांची कामे सुचवली आहेत.
-हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचा अवधी आहे.
आता आली जाग...
मिरजेचे भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी यावर्षीसाठी सुमारे एक कोटीची २५ कामे सुचवली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घाईगडबड सुरु केली आहे. त्यांच्याकडे १ कोटी ४१ लाख ९२ हजाराचा निधी उपलब्ध आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व आमदार फंड खर्च करण्यासाठी त्यांनी धावपळ सुरु केली आहे.