कन्नड फलक हटविण्यासाठी मनसेची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:06+5:302021-03-10T04:28:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरजेतील कुंभार हाॅस्पिटलवर मराठीऐवजी कन्नड व इंग्रजी भाषेत फलक लावला होता. तो हटवून मराठीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील कुंभार हाॅस्पिटलवर मराठीऐवजी कन्नड व इंग्रजी भाषेत फलक लावला होता. तो हटवून मराठीत फलक लावावा, अशी मागणी करीत मंगळवारी मनसेने डाॅक्टरांना टाॅवेल, टोपी व श्रीफळ देऊन गांधीगिरी आंदोलन केले.
मनसेच्या पंधराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याबाबत सावंत म्हणाले की, येथील कुंभार हॉस्पिटलवर कन्नड व इंग्रजी भाषांमध्ये पाटी लावला आहे. आम्ही हाॅस्पिटलमध्ये जाऊन डाॅ. कुंभार यांना टाॅवेल, टोपी, श्रीफळ, हार देऊन सत्कार केला. तसेच मराठी पाटी लवकरात लवकर लावावी, अन्यथा मनसे रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.
मराठी भाषा, तिची अस्मिता व मराठी माणसाचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे. तरी जिल्ह्यात नियम मोडून इंग्रजी व कन्नड भाषेत पाट्या लावल्या जातात. याला कामगार आयुक्त जबाबदार आहेत. मराठी भाषा व पाट्या लावण्याचा कायदा करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा होण्याची गरज आहे. त्यामुळे आता मनसेच्यावतीने मराठी पाट्यांसाठी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विकास मगदूम, विठ्ठल शिंगाडे, किशोर कांबळे उपस्थित होते.