शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर मोका लावा, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा
By शीतल पाटील | Published: October 13, 2022 07:02 PM2022-10-13T19:02:00+5:302022-10-13T19:02:30+5:30
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे
सांगली : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने जिल्ह्यातील नागरिकांना अनेक कंपन्यांनी हजारो कोटींचा गंडा घातला आहे. या कंपन्यांची चौकशी करून दोषीवर मोका कायद्यान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा चुना या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लावला आहे. पोलिसांमध्ये रोज गुन्हे दाखल होत आहेत. कंपन्यांच्या संचालकांना अटकही करण्यात आली आहे. मात्र ठोस कारवाई होत नाही. गुंतवणूकदारांचे पैसे कसे मिळणार याचे उत्तर पोलिसांच्याकडे नाही. कंपन्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांचे पैसे हवालामार्फत परदेशात पाठविल्याची चर्चा आहे.
लोकप्रतिनिधींनी तपास यंत्रणांच्या सहाय्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये काही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उद्योजक, व्यावसायिकांप्रमाणेच सर्वसामान्यांचाही पैसा अडकला आहे. तरीही लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांशी करार केलेला नाही. त्यांचे डिमॅट खातेही उघडलेले नाही. या कंपन्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे संदीप टेंगले यांच्यासह गुंतवणूकदार सहभागी झाले होते.