गायरान जमिनीच्या वादातून पारधी कुटुंबावर जमावाकडून हल्ला, झोपडीसह दुचाकी पेटविल्या; सांगलीतील नरवाड येथे घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:30 PM2022-12-03T13:30:42+5:302022-12-03T13:31:06+5:30
याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी माजी सरपंचासह १५ जणांविरुद्ध दंगल, मारामारी व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे.
मिरज : नरवाड (ता. मिरज) येथे गायरान जमिनीवर कब्जाच्या वादातून पारधी कुटुंबावर गुरुवारी रात्री जमावाने हल्ला करून झोपडीसह दोन दुचाकी पेटविल्या. जमावाच्या हल्ल्यात शिवाप्पा सुभाष पवार यांच्यासह दोन महिला जखमी झाल्या. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी माजी सरपंचासह १५ जणांविरुद्ध दंगल, मारामारी व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे.
नरवाड येथील लक्ष्मीवाडी रस्त्यावरील एका गायरान जमिनीवर शिवाप्पा पवार व नागेश पवार यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबाकडे सुमारे ३५ एकर गायरान जमीन आहे. याच जमिनीवरून शिवाप्पा पवार व शेजारी राहणारे उत्तम पाटील यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. उत्तम पाटील याने गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार नागेश पवार याने केल्याने गुरुवारी हा वाद विकोपाला गेला.
उत्तम पाटील व साथीदारांनी पवार कुटुंबावर हल्ला केला. यावेळी शिवाप्पा पवार यांच्यासह महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने झोपडी व दोन दुचाकी पेटवून देत एका घराची मोडतोड केली. याबाबत माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
जखमी शिवाप्पा पवार यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंच भारत दशरथ कुर्ले, केदार मारुती शिंदे व उत्तम आण्णासाहेब पाटील (रा. नरवाड) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी न्यायलयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सप्रेम दिलीप कुर्ले, रामा आवटे, सुशील माने, विकी संपकाळ, महेश डुबल यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व फरार आहेत. फरारींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.