सांगलीत घरातून मोबाईल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:28+5:302021-07-16T04:19:28+5:30
सांगली : शहरातील लोंढे मळा परिसरात घरात घुसून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी सचिता चंद्रकांत ...
सांगली : शहरातील लोंढे मळा परिसरात घरात घुसून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी सचिता चंद्रकांत लोंढे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
------
मार्केट यार्डसमोर वाहने घसरली
सांगली : शहरातील मार्केट यार्डसमोर रस्त्यावर चिखल आल्याने बुधवारी रात्री दुचाकी घसरून अनेक जण जखमी झाले. पाऊस झाल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने रात्री साडेनऊच्या सुमारास एकाच वेळी चार दुचाकीस्वार घसरून पडले, तर एक मोटारही रस्त्याखाली गेली.
--------
गावांची जातीय नावे बदलण्यासाठी समिती
सांगली : सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होण्यासाठी गावांची, वस्त्यांची व रस्त्यांच्या जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.
----------
सांगलीत शांतता कमिटीची बैठक
सांगली : पुढील आठवड्यात होणाऱ्या बकरी ईद सणावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालनासह आढाव्यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस प्रतिनिधी उपस्थित होते.
-------
कारवाईनंतर रस्ते पडले ओस
सांगली : विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर दुपारनंतर उपनगरातील रस्ते ओस पडले होते. रस्त्यावर असणारे भाजी, फळे विक्रेतेही दुपारनंतर नव्हते तर, पोलिसांनी प्रमुख चौकात थांबून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली होती. यापुढेही पोलिसांकडून कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.