मिरज चोरीतील अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत
By admin | Published: January 24, 2016 12:44 AM2016-01-24T00:44:09+5:302016-01-24T00:44:09+5:30
तिघांना अटक : दुकान फोडणारे चोरटे सांगलीतील; दोन महिन्यांत सहा गुन्हे उघडकीस
मिरज : मिरजेत स्कायलाईन मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपये किमतीचे मोबाईल चोरणाऱ्या सांगलीतील तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. तीन चोरट्यांकडून अडीच लाख रुपये किमतीचे ३४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. अजय बापू कांबळे, (वय १८), पवन धर्मेंद्र साळुंखे (१८), बापू दिलीप काळे (२५, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) अशी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत सहा मोठे गुन्हे उघडकीस आणल्याचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. जवाहर चौकात स्कायलाईन मोबाईल शॉपीची कुलपे तोडून चोरट्यांनी दुकानातील शोकेसमधील सॅमसंग, नोकिया, मायक्रोमॅक्स, सोनी, कार्बन यासह नामवंत कंपन्यांचे सुमारे साडेतीन लाख किमतीचे ७५ किमती मोबाईल घेऊन पलायन केले होते. चोरट्यांनी स्मार्ट फोनसह दुकानातील सीसी टीव्हीचे चित्रण होणारे डीव्हीआर मशीनही चोरून नेले. याप्रकरणी दुकानमालक संदेश वाघमारे यांनी फिर्याद दिली होती.
शहरात भरवस्तीतील दुकान फोडून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकातील योगेश पाटील, प्रशांत कोळी, सागर आंबेवाडीकर, श्रीपाद शिंदे, बसवराज शिरगुप्पे यांना सांगलीत बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास येथे काहीजण चोरीचे मोबाईल स्वस्तात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी मिरजेत दुकान फोडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तिघेही बांधकामावर मजुरी, सेंट्रींग अशी किरकोळ कामे करणारे आहेत. त्यांनी यापूर्वी चोऱ्या, घरफोड्या केल्या आहेत काय, याची खात्री करण्यात येत आहे. चोरट्यांकडून सुमारे अडीच लाख किमतीचे ३४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी एरंडोलीतील दुकानफोडी, ट्रॅक्टर चोरी, वकिलाची मोटार चोरी, इराणी टोळीकडून दागिने चोरी असे सहा मोठे गुन्हे उघडकीस आणून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)