सांगली शहरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:49 AM2021-03-04T04:49:10+5:302021-03-04T04:49:10+5:30
सांगली : ‘माझ्या मुलीला मोबाईलवरून मेसेज का करतोस, तुझा मोबाईल आण’, असे म्हणत तरुणांकडून मोबाईल घेऊन पसार होण्याचा नवा ...
सांगली : ‘माझ्या मुलीला मोबाईलवरून मेसेज का करतोस, तुझा मोबाईल आण’, असे म्हणत तरुणांकडून मोबाईल घेऊन पसार होण्याचा नवा फंडा सध्या चोरट्यांनी अवलंबला आहे. शहरात अशा दोन घटना घडल्या असून, त्यात चोरट्यांनी दोन तरुणांचे मोबाईल लंपास केले.
विश्रामबाग परिसरातील दामाणी हायस्कूलजवळ २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रितेश कोलप हा तरुण मित्र गौरवसह चालत निघाला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी रितेश याला ‘तू माझ्या मुलीस मोबाईलवरून मेसेज का करतोस’, असे म्हणत त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत रितेश याचा चुलत भाऊ राहुल महिंद्र कोलप (वय २८) याने फिर्याद दिली आहे.
दुसरी घटना महावीर उद्यान परिसरात घडली. यात रोहित कोरे याचा मोबाईल चोरट्याने ‘तू माझ्या मुलीस त्रास देतोस’ असे म्हणत धक्काबुक्की करत काढून घेतला. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी पावणेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी दादासाहेब कोरे (वय ४२) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चौकट
जबरदस्तीने मोबाईल लंपास
पाचवड (ता. वाई) येथील सागर चंद्रकांत मोरे (वय ३५) हा २८ फेब्रुवारी रोजी रात्री सांगलीतून मोटारसायकलीने घरी निघाला होता. अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ त्याला तीन तरुणांनी अडविले. त्याच्याकडील मोबाईल व ५ हजार ९०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल काढून घेऊन पलायन केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांत नोंद झाली आहे.