इस्लामपुरातील बंड्या कुटे टोळीला मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:54+5:302021-03-21T04:24:54+5:30
इस्लामपूर : शहरातील नेहरूनगर परिसरातील बांधकाम मजुराचा १,५०० रुपये लुटण्यासाठी निर्घृण खून करणाऱ्या बंड्या कुटे टोळीतील तिघांना मोक्का लावण्यात ...
इस्लामपूर : शहरातील नेहरूनगर परिसरातील बांधकाम मजुराचा १,५०० रुपये लुटण्यासाठी निर्घृण खून करणाऱ्या बंड्या कुटे टोळीतील तिघांना मोक्का लावण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी इस्लामपुरातील या टोळीला ‘मोक्का’चा दणका देताना गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा इशारा दिला.
आतापर्यंतची ही सातवी कारवाई असून, एकूण ४० गुन्हेगार गजाआड गेले आहेत. बंडा उर्फ संदीप शिवाजी कुटे (२२), अनिल गणेश राठोड (२६, दोघे रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) आणि ऋतिक दिनकर महापुरे (२१, खांबे मळा, इस्लामपूर) अशी मोक्का लागलेल्या तिघांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध लुटमार आणि जबरी चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.
या तिघांनी ७ मार्चच्या मध्यरात्री राजेश सुभाष काळे या बांधकाम मजुराचा डोक्यात लोखंडी गज आणि दगड घालून खून केला. त्याच्या खिशातील १,५०० रुपयांची रोकड, मोबाईल आणि आधारकार्ड घेत पलायन केले. मात्र, अवघ्या ७२ तासात कसलाही पुरावा अगर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या.
इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्यात वापरलेला लोखंडी गज, ओढ्यात टाकलेले अंगावरील कपडे, मोबाईल जप्त केला. लुटलेली रक्कम अनिल राठोड याच्या घरातून हस्तगत करताना तिथे खून झालेल्या राजेश काळे याचे आधारकार्डही पोलिसांना मिळाले. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी या टोळीविरुद्ध मोक्का लावण्याचा प्रस्ताव अधीक्षक गेडाम यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला होता. त्याला लोहिया यांनी मंजुरी दिली.
पोलीस अधीक्षक गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक देशमुख, पोलीस कर्मचारी सचिन सुतार, संदीप सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
चाैकट
सातवा मोक्का
इस्लामपूर उपविभागातील मोक्का कायद्याची ही सातवी कारवाई ठरली. यापूर्वी सोन्या शिंदे (७ जण), अनमोल मदने (४ जण), कपिल पवार (३ जण), आज्या मेहेरबान (७ जण), बंड्या कुटे (३ जण) या इस्लामपूर शहरातील गुंडांच्या टोळ्या, तर आष्टा येथील उदय मोरे टोळी (८ जण) आणि पारधी टोळी (८ जण) अशा ७ टोळ्यांमधील ४० सराईत गुन्हेगारांना गजाआड केले गेले आहे.