पूरग्रस्तांसाठी मॉडेल व्हिलेजची निर्मिती, १२५ कुटुंबांचे होणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:16 PM2019-09-10T15:16:59+5:302019-09-10T15:19:09+5:30
बुरुंगवाडी व खंडोबाचीवाडी या ठिकाणी शासनाच्या जागेत होणारे पुरग्रस्तांचे पुनर्वसन हे देशातील मॉडेल व्हिलेज ठरेल अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली.
भिलवडी (जि. सांगली) : कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील धनगाव व भिलवडी या पलूस तालुक्यातील दोन पूरग्रस्त गावातील बाधित सव्वाशे कुटुंबांचे पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणार आहे.
ही घरे पर्यावरणपूरक असून दिवाळी पर्यंत पन्नास टक्के घरे बांधली जाणार असून बुरुंगवाडी व खंडोबाचीवाडी या ठिकाणी शासनाच्या जागेत होणारे पुरग्रस्तांचे पुनर्वसन हे देशातील मॉडेल व्हिलेज ठरेल अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून धनगाव व भिलवडी या दोन गावातील पूररेषेतील १२५ पूरग्रस्त कुटुंबांना अद्ययावत घर देऊन त्यांचं पुनर्वसन केले जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला. अनेक लोकांची घरे पुराच्या पाण्यात बुडाली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शेकडो लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. तिथल्या लोकांसाठी सुरुवातीला बचावकार्य आणि त्यानंतर मदत कार्य मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले होते.
पूर ओसरल्यानंतर पूर पट्ट्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या साठी शासनाने तातडीने चांगला निर्णय घेतला आहे. पूररेषेत येणाऱ्या पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार आहे. पलूस तालुक्यातील धनगाव येथील ५५ आणि भिलवडी येथील ७० कुटुंबांचा पहिल्या टप्प्यात समावेश केला जाणार आहे. यासाठी जवळपास अकरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दीड हजार चौरस फूट जागा एका कुटुंबाला देण्याचे नियोजन होते, मात्र सामाजिक कार्यकर्ते दत्ता उतळे आणि ग्रामस्थांनी दीड हजारऐवजी एक हजार चौरस फूट जागा द्यावी म्हणजे जास्तीजास्त पूरग्रस्तांना घरे उपलब्ध होतील अशी विनंती केली. या विनंतीचा विचार करून प्रत्येकाला एक हजार चौरस फूट जागा दिली जाणार आहे.
बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सोबत महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष नयन शहा, प्रवीण दोशी,मयूर शहा, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी मारुती बोरकर, पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, दत्ता उतळे, दीपक भोसले, सतपाल साळुंखे, रायसिंग हिरुगडे, जी. बी. लांडगे, घनश्याम साळुंखे, सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते
अशी असतील घरे...
पात्र १२५ प्रत्येक कुटुंबाना एक हजार चौरस फूट जागा मिळेल. त्यात ४०० चौरस फुटात तीन खोल्या, शौचालय, बाथरूम आणि उर्वरित ६०० चौरस फुटात मागे गोठ्या साठी जागा आणि पुढे जागा मिळणार आहे. घरात सोलर लाईट सिस्टीम, इकोफ्रेंडली टॉयलेट, रेन वॉटर सिस्टीम, स्लॅबची घरे असल्याने भविष्यात त्यावर मजला बांधता येईल. त्याचप्रमाणे कॉलनीत अंतर्गत रस्ते, वीज, पाणी यासह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.