जनसामान्यांचे संयमी नेतृत्व...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:36+5:302020-12-08T04:23:36+5:30
अरुणअण्णा डॉ. जी. डी. बापूंच्या विचारांची जोपासना करीत, शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत राहिले आहेत. अरुणअण्णा हे शेतकरी, कष्टकरी, ...
अरुणअण्णा डॉ. जी. डी. बापूंच्या विचारांची जोपासना करीत, शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत राहिले आहेत. अरुणअण्णा हे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे नेते आहेत. उपेक्षित समाजघटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते गेली पन्नास वर्षे सार्वजनिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु याचवेळी अरुणअण्णा डॉ. जी. डी. बापूंच्या पावलावर पाऊल ठेवून बंधू किरण लाड यांच्या अनमोल साथीने कुटुंबातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून यशस्वी वाटचालीत कार्यरत आहेत.
आ. अरुणअण्णा शांत, संयमी, निष्कलंक, नि:स्पृह व कष्टाळू लोकांना बरोबर घेऊन कार्यरत राहणारे नेते आहेत. विद्यार्थी जीवनातच त्यांनी पुरोगामी विद्यार्थी संघटनेद्वारे कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (अॅग्री) पदवी संपादन केली व त्यानंतर कृषी पदवीधर संघाची स्थापना करून, सार्वजनिक कार्यातील सहभागाचा वेग गतिमान केला. याचवेळी डाव्या पुरोगामी पक्षांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सचिवालयापर्यंत, शेतीला परवडणाऱ्या दराने वीज पुरवठा व पाणी पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, जनतेच्या हाताला काम द्यावे, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
इरिगेशन फेडरेशन, वीज दरवाढ कृती समिती, जागतिकीकरणविरोधी कृती समिती, अन्यायाविरुद्ध संघर्ष समिती या कष्टकरी शेतकऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून शेतीपंप वीज दरवाढ रद्द करावी, वीजचोरीला प्रतिबंध घालण्यात यावा, विदेशी मालाच्या आयातीवर निर्बंध घालण्यात यावा, दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, यासाठी झालेल्या आंदोलनात अरुणअण्णा अग्रभागी होते.
वीस वर्षांपूर्वी क्रांती कारखाना उभारणीवेळी अरुणअण्णा यांची भेट घेऊन उभारणीतील काही सिव्हिल कामे घेतली. त्यावेळी अण्णांची व माझी पहिल्यांदा भेट झाली. मी अण्णांना घेतलेली कामे वेळेत व दर्जेदार करून देण्याची ग्वाही दिली. त्याप्रमाणे करून दिली. त्यानंतरही माझ्यावर कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. ती तेवढ्याच क्षमतेने पूर्ण केली. त्यातूनच माझे व क्रांती समूहाचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंपासून ते शरदभाऊ यांच्यापर्यंत सर्वांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अण्णांनी सदैव आमच्यावर विश्वास ठेवला. त्यातूनच पुढे जात आम्ही या कामाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या विश्वासातून व प्रेरणेतून पार पाडत आलो आहे. म्हणून मी एवढेच म्हणेन, अरुणअण्णा हे त्यांच्या सान्निध्यातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रेरणेने परिसरातील कित्येक लोकांना रोजगाराची व उद्योगाची संधी उपलब्ध झाली आहे.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंनी उभारलेल्या क्रांती साखर कारखान्याच्या माध्यमातून अण्णांनी निसर्गसंवर्धनासाठी झाडांची लागवड करून त्यांचे जतन केले. २०१९ चा महाप्रलयंकारी महापूर व २०२० चा कोरोना, यावेळी अण्णांनी वैद्यकीय सेवा, पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे, निवारा, जनावरांच्याप्रसंगी आर्थिक मदतही केली आहे. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून क्रांती गारमेंट, बचत गटांसाठी लघु उद्योगांच्या सोयी आणि दूध संघाच्या माध्यमातून परिसरातील व परिसराबाहेरील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव देण्याचे काम त्यांनी केले आहे.
कुंडल आणि परिसरात उभारलेल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू यांच्या पाणी पुरवठा संस्थांचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक बनविला आहे. त्यांनी उभारलेला क्रांती सहकारी साखर कारखाना आज सहकारी साखर कारखानदारीत सर्वांना दीपस्तंभाप्रमाणेच आहे. याचे सर्व श्रेय आ. अरुणअण्णा लाड यांनाच आहे. अरुणअण्णांच्या दूरदृष्टीने व कुशल नेतृत्वाने क्रांती कारखान्याला अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेकबाबतीत कारखाना अल्पावधित नावारूपाला आला आहे. समाजप्रबोधनासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना ‘क्रांतिअग्रणी’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यातूनच त्यांनी समाजसेवेचा वसा आणि वारसा अखंडपणे जपलेला आहे. तरुणांचे मन, मेंदू व मनगट बळकट करण्यासाठी कुस्ती केंद्र सुरू केले आहे. कुंडलचे कुस्ती मैदान प्रसिद्ध आहे. गांधी एज्युकेशन सोसायटीद्वारे शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे.
अरुणअण्णांनी सामाजिक बांधिलकी जपत कामाचा डोंगरच उभा केला आहे. विपुल लोकसंग्रह आहे. शांत व संयमी वृत्तीने ते अजातशत्रू आहेत. त्यांची दूरदृष्टी, निष्ठा आणि निष्कलंकता यामुळे त्यांना पुणे पदवीधरच्या माध्यमातून विधानपरिषदेत काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचे ते सोने करून दाखवतील. त्यांच्या या निवडीनिमित्ताने त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा...!
- वसंत डी. वाजे, वाळवा