समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:18 PM2018-08-12T23:18:28+5:302018-08-12T23:18:43+5:30

Moderate organizations should come together: Medha Patkar | समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

Next

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र मी लोकांचा सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पेणचे आमदार भाई धैर्यशील पाटील होते. यावेळी डॉ. राजन गवस, ललित बाबर, भाई संपतराव पवार, सौ. विजया पवार, आनंद अवधानी उपस्थित होते.
पाटकर म्हणाल्या, चळवळीला पूरक असे काम संपतराव पवार व त्यांच्या विचारकांनी केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच राजकीय, सामाजिक, आर्थिक यावर भाष्य करणारे आत्मचरित्र आहे. याचा अनुभव लोेकलढ्याशी नाळ जोडणारा आहे. धरणामुळे विकास संपत असेल, विकासाचा तंत्र-मंत्र किती विकृत झाला आहे. विकृतीचा आधार घेत राजकारण करत आपल्या मतांच्या बॅँका भरून घेतल्या जात आहेत. आज वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांच्या सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जो कष्टकरी व श्रमिक आहे, त्याला स्थानही नाही व दामही नाही. त्यामुळे असे घडत आहे. हा देश विचारशील, संवेदनशील असूनही, आत्महत्यांनी असंवेदनशील बनला आहे. महाराष्टÑातील एकूण धरणांपैकी मोठी धरणे आठ टक्क्यांपेक्षाही जास्त भरली नाहीत, हे वास्तव आहे.
राजन गवस म्हणाले, या पुस्तकात समाजाचे मानसशास्त्र मांडले आहे. मराठी माणसाच्या अंतरंगातील गुंते आणि पेच, डाव्या चळवळीच्या अपयशाचे तर्क शास्त्र, आधुनिकता व द्वंद्वनिष्ठता, जगण्याची तत्त्वनिष्ठता सांगितली आहे.
आमदार धैर्यशील पाटील म्हणाले, चळवळी या राज्याला दिशा देण्याचे काम करतात. कायदे हे संसदेत होत नाहीत, ते रस्त्यावरील चळवळीतूनच होतात. सेझ धोरण किती फसवे आहे, हे रायगडमध्ये शेकापने केलेल्या आंदोलनामुळे दिसून येते. सेझ धोरण स्वीकारले असते, तर देशाचे वाटोळे झाले असते.
अ‍ॅड. संदेश पवार यांनी स्वागत केले. यावेळी राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा छाया पाटील, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरूण लाड, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. इंद्रजित मोहिते, सरपंच प्रवीण पवार, डी. के. गायकवाड, व्ही. वाय. पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. अमोल पवार, मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, पापा पाटील उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले, तर प्रा. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले.
पारंपरिक स्वागताने उपस्थित भारावले..
क्रांती स्मृती वनात आयोजित करण्यात आलेल्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांना शेंगा व गूळ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Moderate organizations should come together: Medha Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.