मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी; घालवायलाच हवी, संजय राऊतांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 01:54 PM2024-04-20T13:54:17+5:302024-04-20T13:54:56+5:30
सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
सांगली : ‘अब की बार मोदी सरकार नहीं चलेगा. मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे. तिला घालवलेच पाहिजे,’ अशी टीका उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. ‘सांगलीतील भाजप खासदाराला जनता आताच तडीपारीची नोटीस देत आहे. गो मोदी म्हणून थाळ्या वाजवायच्या आहेत,’ असेही राऊत म्हणाले.
सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी शहरातून रॅली काढली. त्यानंतर मारुती चौकात सभा घेण्यात आली. यावेळी राऊत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, ‘सांगलीत एकास एक लढाई होईल. पुढील १५ दिवस मी येथेच थांबणार आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरदचंद्र पवार गट) जयंत पाटील म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जिल्ह्यासाठी अनेक विकासप्रकल्प दिले. त्याची दखल येथील मतदार नक्कीच घेतील.’
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड, सुमनताई पाटील, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानगुडे - पाटील आदी उपस्थित होते. परंतु, काँग्रेसचा एकही पदाधिकारी या सभेला उपस्थित नव्हता.
उद्धव ठाकरे कोणाचे ऐकत नाहीत..
विरोधकांनी पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून मराठी माणसांचे दोन मोठे पक्ष फोडण्याचे पाप केले. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीशी माझा काही संबंध नाही. उद्धवसेना आणि काँग्रेसचा हा निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात एकदा फिट झाले की ते कोणाचे ऐकत नाहीत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.