मोदी सरकारला पाकपेक्षा शेतकरी मोठा शत्रू वाटतो, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:24 AM2020-11-07T02:24:25+5:302020-11-07T06:43:18+5:30
Balasaheb Thorat : केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सांगलीत काँग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली : देशातील मूठभर लोकांसाठी काम करणाऱ्या मोदी सरकारने शेतकरीविरोधी कायदे करून शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पाकिस्तानपेक्षा देशातील शेतकरी त्यांना मोठा शत्रू वाटतो, अशी घणाघाती टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केली.
केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सांगलीत काँग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी सोनल पटेल, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना नव्या कायद्याबाबत माहिती नाही. पंजाब, हरियाणात या कायद्याची झळ शेतकऱ्यांना बसल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. अजून आपणाला त्याचा फटका बसला नसला तरी, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. नुकतीच केंद्राने कांद्यावर निर्यातबंदी केली. आता पाकिस्तानातून कांदा आयात करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे केंद्राला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो.